माजी महापौरांनी अखेर रामायण बंगला सोडला

jalgaon-digital
4 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

2017 साली झालेल्या नाशिक महापालिका निवडणुकीत ( NMC Elections ) नाशिककरांनी भरभरून मतदान देऊन तब्बल 66 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे ( BJP ) निवडून दिले होते तर नाशिक महापालिकेचा एक हाती कारभार भाजपच्या हाती देण्यात आला होता.पक्षाने दुसर्‍या वेळेस मला महापौर होण्याची संधी दिली.महापौरपदाच्या कार्यकाळात शेवटच्या दिवसापर्यंत मी नाशिकच्या विकासासाठी काम करत होतो.अत्यंत अखेरच्या दिवसापर्यंत देखील नमामि गोदा भूमिपूजन कार्यक्रम सुरू होता.

यावेळी महापालिका आयुक्तांना मला महापौरांचे शासकीय निवासस्थान (The official residence of the mayor )असलेला रामायण बंगला (Ramayana Bungalow )विकास कामे मार्गी लावण्यासाठी काही दिवस मिळावा हे पत्र दिले होते. मात्र प्रशासनाने कठोर कारवाई करत दुसर्‍या दिवशी रामायण सील करण्याची कारवाई केली. यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासन कैलास जाधव यांच्याशी चर्चा केली तरी रामायण बंगला वापरण्यासाठी भाडे भरावे लागेल, असे पत्र देण्यात आले व तेथील सेवक देखील कमी करण्यात आले. यामुळे काल 17 मार्च रोजी मी महापौर यांचे शासकीय निवासस्थान असलेला रामायण बंगला सोडत असल्याची माहिती माजी महापौर सतीश कुलकर्णी (Former Mayor Satish Kulkarni )यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय परिस्थिती ही विकासाभिमुख नसल्याने व दबावतंत्र वापरुन दडपशाही पध्दतीची असल्याने नाशिक शहरातही यापेक्षा वेगळे होणे अपेक्षित नसल्याने मी आज रामायण निवासस्थान सोडत असल्याचे माजी महापौर कुलकर्णी यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, मागील पूर्ण महिना मी मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन व आय टी परिषद यामध्ये अतिशय व्यस्त असल्याने मनपा आयुक्तांना पत्र देऊन अगदी शेवटी शेवटी मनपाने काढलेल्या विकास कामे व इतर कामे लिंक करण्यासाठी मला महापौर निवास स्थान 10 ते 15 दिवस उपलब्ध व्हावे म्हणून पत्र दिले होते व दि.15 मार्च रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन आयुक्त जाधव यांच्यासमवेत चर्चाही केली होती.

18 ते 20 मार्चपर्यंत सलग तीन दिवस सुट्टी असल्याने दि. 31 मार्च पर्यंत रामायण निवासस्थान वापरासाठी आयुक्तांशी सकारात्मक चर्चा झाली तरी त्यानंतर 14 मार्च ते 31 मार्चपर्यंत प्रति स्क्वेअर फूट भाडे द्यावे लागेल, असे पत्र पाठविले व लगेच रामायण वरचे कर्मचारी देखील काढून घेण्यात आले. यामुळे प्रशासनाची भूमिकाही मला समजली. नगरसेवकांचे रखडलेली विकास कामे व समस्या, शहर विकासासाठी मार्गी लागावे व कांमाचा पाठपुरावा व्हावा, हा माझा हेतू होता, माझ्या खाजगी निवासस्थान येथुन मनपाचे उर्वरित काम होऊ शकत नसल्याने व निवडणूक आचारसंहिता न लागल्यामुळे उरलेली कामे व्हावी, असा उददेश होता असे कुलकर्णी यांनी सांगितले.

माझ्या 35 वर्षातील राजकीय कारकीर्दीत अनुभव, नियम व संयम या त्रिसूत्रीने मी कार्यरत राहीलो आहे व यापुढेही नाशिककर जनतेसाठी मी सदैव तत्पर राहील. मी केलेल्या कामांना नाशिककर जनतेने दिलेला प्रतिसाद, प्रेम, जिव्हाळा हा कायम मला माझ्या कारकीर्दीला प्रोत्साहीत करेल.

सतीश कुलकर्णी, माजी महापौर नाशिक

रामायणवरील सेवक काढले

महापालिका आयुक्तांनी दोन दिवसापूर्वीच शासकीय निवासस्थान असलेला रामायण बंगल्यावरील सर्व स्टाफ, अधिकारी व सेवक यांना तेथून कमी करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये एकूण पाच शिपाई, एक चालक व दोन लिपिक आदींचा समावेश होता.दरम्यान आज हे सर्व व अधिकारी व सेवक यांचा बंगल्यावर अंतिम दिवस होता. कालच महापौर असलेले कुलकर्णी यांनी बंगला सोडण्याचा निर्णय घेतला, यामुळे काल दिवसभर रामायण वरील साहित्य हलविण्याची कारवाई सुरू होती. एकीकडे माजी महापौर तिथून निघाले तर दुसरीकडे प्रशासकांच्या आदेशावरून सेवक देखील कमी करण्यात आले. आता महापालिका निवडणूक झाल्यानंतर कोणाची सत्ता महापालिकेत येते व कोण नवीन महापौर या बंगल्याचा ताबा घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *