नाशिक। प्रतिनिधी

जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी रूग्णालयांद्वारे आतापर्यंत 1 लाख 56 हजार 701 नागरीकांना करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात 5 हजार 494 जणांचे लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता 16 जानेवारी 2021 पासून जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली.

लसीकरणाचा आता तिसरा टप्पा सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसर्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्स, तर आता तिसर्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह 45 वर्षांपुढील व्याधीग्रस्त व्यक्तींनाही लस दिली जाते आहे.

गुरुवारी ( 18 मार्च) पर्यंत एकुण 1 लाख 56 हजार 701 जणांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. यामध्ये 60 वर्षावरील 66 हजार 45 तर 45 वर्षावरील 16 हजार 618 नागरीकांनी लस घेतली आहे. तर 22 हजार 917 जणांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत.

काल दिवसभरात जिल्ह्यात 4783 जणांना पहिला डोस तर 711 जणांना दुसरा डोस देण्यात आला. यामध्ये नाशिक पालिका हद्दीत 2 हजार 335, ग्रामिण जिल्ह्यात 2 हजसा 257, मालेगाव मनपा 191 असे लसीकरण झाले आहे. यापैकी 61 टक्के जणांनी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिपत्याखाली असलेल्या केंद्रांवर लस घेतली आहे. दरम्यान शासकीय 38 व खासगी 40 अशा एकुण 78 रूग्णालयांमधून हे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

23 हजार जणांना दुसरे डोस

करोना संसर्गापासून वाचवू शकणार्या प्रतिबंधक लसीचे वितरण युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील 22 हजार 917 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. या लसीचे दोन डोस घेणे अनिवार्य असून, पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. यानंतरच रोग प्रतिकारक शक्ती वाढत असल्याचा दावा आहे.