'या' दिवशी होणार मनपा करवाढीची अंतिम सुनावणी; वाचा सविस्तर

'या' दिवशी होणार मनपा करवाढीची अंतिम सुनावणी; वाचा सविस्तर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिककरांवर तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लादलेल्या अवाजवी घरपट्टीवाढीविरोधात दाखल याचिकेवर येत्या 12 जानेवारीला उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होत आहे. सार्वभौम महासभेला डावलून तसेच राज्य शासनाच्या अधिकारातही हस्तक्षेप करून स्वत:ची मनमानी करणार्‍या मुंढे यांच्यावर या याचिकेतून लावलेल्या आक्षेपांवर उच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरातील मिळकतींच्या करयोग्य मूल्यदरात चार ते सहापट अवाजवी वाढ करत तत्कालीन आयुक्त मुंढे यांनी नाशिककरांवर अन्यायकारक घरपट्टीवाढ लादली होती. यासंदर्भात मुंढेंनी स्वत:च्या अधिकारात 31 मार्च 2018 रोजी एकतर्फी आदेश क्र.522 काढला होता. या करवाढीविरोधात अवघे शहर रस्त्यावर उतरल्यानंतर तत्कालीन महापौर रंजना भानसी यांनी महासभेचा अंतिम ठराव देताना सरसकट 18 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला.

आदेश क्र.522 रद्द करण्याचा ठराव महासभेने केला असतानाही मुंढेंनी मात्र हा ठराव दप्तरी दाखल करून घेत करवाढ कायम ठेवली. ही करवाढ जास्त असल्यामुळे आणि महासभेच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्यामुळे अपक्ष नगरसेवक गुरुमित बग्गा, काँग्रेस गटनेते शाहू खैरे, माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यासंदर्भातील याचिकेवर गेल्या दोन वर्षांसून न्या. शुक्रे व न्या.चंदवानी यांच्या पीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्ते आणि महापालिकेचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने 12 तारखेला अंतिम निर्णय देणार असल्याचे जाहीर केले आहे. याचिकाकर्त्यांकडून उच्च न्यायालयात अ‍ॅड.संदीप शिंदे बाजू मांडत आहेत.

घरपट्टी भरा, अन्यथा मालमत्ता लिलाव; थकबाकीदारांना मनपाचा इशारा

महापालिका कर संकलन विभागाने तीन लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या जवळपास 60 कर बुडव्यांची यादी तयार केली असून त्यांना पुढील आठवड्यात वॉरंट बजावले जाणार आहे. त्यानंतर 21 दिवसांत घरपट्टी भरणा केला नाही तर त्यांच्या मालमत्तेचा लिलाव केला जाईल. या 60 थकबाकीदारांकडे 1 कोटी 80 लाख रुपये थकले आहेत.

करसंकलन विभागाला घरपट्टीची 350 कोटींची थकबाकी वसूल करायची आहे. आयुक्तांनी मागील आठवड्यात बैठक घेत करसंकलन विभागाला शंभर टक्के वसुलीसाठी येत्या 15 तारखेची डेडलाईन दिली असून उद्दिष्ट साध्य न झाल्यास संबंधित अधिकार्‍यांना कारवाईस समोरे जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे करसंकलन विभाग थकबाकीदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे.

यापूर्वी 75 हजार थकबाकीदारांना सूचनापत्र जारी केले होते. त्यापैकी पाच हजार थकबाकीदारांनी जवळपास पंधरा कोटींचा भरणा केला. इतरांकडूनदेखील वसुली सुरू आहे. त्यापुढे जात करसंकलन विभाग आणखी कठोर कारवाईच्या विचारात असून वॉरंट बजावण्याची तयारी सुरू केली आहे. तीन लाखांहून अधिक थकबाकी असलेले रडारवर आहेत. प्रत्येक विभागातील दहा असे सहा विभागातील एकूण 60 थकबाकीदारांना वारंट काढले जाणार आहे.

दिलेल्या मुदतीत थकबाकी अदा न केल्यास थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव केला जाईल. थकबाकीदाराला वॉरंट जारी करून घरपट्टी अदा करण्यास ठाराविक मुदत दिली जाईल. या मुदतीत त्याने थकबाकी भरण्यास हात वर केले तर त्याची मालमत्ता जप्त केली जाईल. त्या मालमत्तेचा लिलाव ठेवला जाईल. अगोदरचा अनुभव पाहता अशा लिलावास प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे महापालिका स्वत: एक रुपया बोलीने लिलावात मालमत्ता खरेदी करेल व त्यावर महापालिकेचे नाव लावेल.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com