Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedत्र्यंबकेश्वर ते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, दादासाहेबांचा संघर्षमय प्रवास

त्र्यंबकेश्वर ते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, दादासाहेबांचा संघर्षमय प्रवास

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, चित्रपट महर्षी धुंडिराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब या नावानेच ते अधिक प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म नासिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे वडील गोविंदशास्त्री तथा दाजीशास्त्री व मातोश्री द्वारकाबाई. दाजीशास्त्री स्वत: संस्कृत भाषेचे विद्वान आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचे पुजारी होते. त्यामुळे दादासाहेबांचे बालपण धार्मिक वातावरणात व्यतीत झाले. दादासाहेब १२ वर्षांचे असताना दाजीशास्त्रींनी मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेज येथे संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली आणि फाळके कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले.

मुंबईत शालेय शिक्षण

मुंबई येथे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १८८५ मध्ये त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून एक वर्षाचा चित्रकलेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कलाभवनातून त्यांनी तैलरंगचित्रण, जलरंगचित्रण, वास्तुकला आणि नमुना प्रतिरूपण (मॉडेलिंग) यामध्ये प्रावीण्य मिळवले (१८९०). याचबरोबर त्यांनी छायाचित्रण, प्रकाश शिलामुद्रण (फोटोलिथोग्राफी) या व्यावसायिक कलांचेही शिक्षण घेतले. त्यात विविध प्रयोगही केले. अहमदाबाद येथील १८९२ मधील औद्योगिक प्रदर्शनात त्यांच्या ‘आदर्शगृहा’च्या प्रतिकृतीला सुवर्णपदक मिळाले.

- Advertisement -

पुरातत्व विभागात नोकरी

दादासाहेबांनी १९०३ साली भारतीय पुरातत्त्व खात्यात प्रारूपकार आणि छायाचित्रकार म्हणून नोकरी पतकरली. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारतातील अनेक वास्तुशिल्पे पाहता आली. त्यांच्या धडपड्या स्वभावामुळे लवकरच ते नोकरीच्या बंधनांना कंटाळले व त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात ते वाकबगार होते. त्यांनी राजा रविवर्मांसोबत काम केले. पुढे त्यांनी स्वतःचा छापखाना काढला. १९०८ मध्ये त्यांनी लोणावळ्याला ‘फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग प्रेस (वर्क्स)’ ही संस्था सुरू केली. पुढे ती दादरला हलविली. तिचे रूपांतर ‘लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स’मध्ये झाले. १९०९मध्ये दादासाहेब जर्मनीहून तीनरंगी मुद्रणप्रक्रियेचे अद्ययावत तांत्रिक शिक्षण घेऊन भारतात परतले व ही संस्था त्यांनी भरभराटीस आणली. पण व्यवसायातील भागीदारांबरोबर बेबनाव झाल्यामुळे ते वेगळे झाले (१९११). यामुळे दादासाहेब उद्विग्न होते.

चित्रपट व्यवसायात पदार्पण

मुंबईमध्ये १५ एप्रिल १९११ रोजी लाईफ ऑफ जिझस ख्राईस्ट ( ‘ख्रिस्ताचे जीवन’) हा मूक चित्रपट पाहिला आणि त्यांच्या आयुष्यातले ध्यासपर्व सुरू झाले. स्वदेशी चित्रपट बनवायचा या विचाराने त्यांना झपाटून टाकले. भारतीय इतिहासातील महान व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीकृष्णाच्या जीवनावरही असाच चित्रपट बनवायचा ध्यास घेऊन अथक प्रयत्नांनी त्यांनी लंडनला जाऊन चित्रपटविषयक तांत्रिक ज्ञान मिळवले. स्वदेशी चित्रपट व्यवसाय उभारण्याचे त्यांनी ठरविले आणि त्या दृष्टीने त्यांचा चित्रपट निर्मितीविषयक अभ्यास रात्रंदिवस सुरू झाला. डोळ्यांवरील अतिताणाने त्यांना तात्पुरते अंधत्व आले; परंतु सुदैवाने मुंबईचे डॉ. प्रभाकर या नेत्रविशारदाने त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली.

इंग्लंडला रवाना

एक फेब्रुवारी १९१२ रोजी ते इंग्लंवडला रवाना झाले. आवश्यक यंत्रसामग्री व कच्च्या फिल्मची मागणी नोंदवून एक एप्रिल १९१२ रोजी ते भारतात परत आले. सर्व सामग्री १९१२ च्या मे अखेर हाती आल्यावर त्यांनी कुटुंबीयांचे चित्रीकरण करून पाहिले व त्यानंतर जून-जुलैमध्ये रोपट्याची वाढ हा एक मिनिटाचा लघुपट तयार केला. तो समाधानकारक वाटल्यानंतर ते मोठ्या चित्रपटाच्या निर्मितीकडे वळले.

पत्नीचे दागिने टाकले गहाण

भांडवलासाठी पत्नीचे दागिनेही त्यांनी गहाण टाकले. त्यातून मुंबईच्या कोरोनेशन चित्रपटगृहामध्ये त्यांनी निर्मिलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट तयार केला. त्यात लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, कलादिग्दर्शक, दिग्दर्शक, रसायनकार, संकलनकार अशा सगळ्या भूमिका दादासाहेबांनीच पार पाडल्या. मुंबईच्या त्या वेळच्या सँडहर्स्ट रोडवरील नानासाहेब चित्रे यांच्या कोरोनेशन थिएटरमध्ये ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित केला. हा चित्रपट एकूण २३ दिवस चालला.

पौराणिक कथांवर चित्रपट

राजा हरिश्चंद्रानंतर फाळक्यांनी मोहिनी भस्मासूर या चित्रपटाची निर्मिती केली व तो १९१४ च्या जानेवारीत कोरोनेशन सिनेमामध्ये प्रदर्शित केला. या चित्रपटासोबत पिठाचे पंजे हा एक विनोदी लघुपटही ते दाखवीत. पुढे सत्यवान सावित्री नावाचा आणखी एक चित्रपट तयार करून प्रदर्शित केला. आपला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट ३ एप्रिल १९१७ रोजी नव्याने पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रदर्शित केला. तसेच लंकादहन हा चित्रपटही त्याच वेळी तयार करून तोही प्रदर्शित केला. हा चित्रपट भारतभर लोकप्रिय झाला. महानंदासारख्या दर्जेदार अशा एकूण ३८ चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले.

दादासाहेबांच्या नावाने पुरस्कार

दादासाहेबांच्या जन्मशताब्दीपासून चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत-तंत्रज्ञाला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देण्यात येतो. दादासाहेबांच्या जन्मशताब्दीपासून भारत सरकारने ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली (१९६९). हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे. याचे स्वरूप दहा लाख रुपये आणि सुवर्णकमळ असे आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत-तंत्रज्ञाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. भारतीय टपाल खात्यानेही दादासाहेबांच्या सन्मानार्थ १९७१ साली त्यांचे छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटाचे अनावरण केले. मुंबई येथील चित्रनगरी (फिल्मसिटी) आता दादासाहेब फाळके चित्रनगरी या नावाने ओळखली जाते. दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी २००९ साली हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटातून दादासाहेबांचे कार्यकर्तृत्व प्रेक्षकांसमोर आणले.

- Advertisment -

ताज्या बातम्या