
नाशिक । प्रतिनिधी Nashik
मनपा अधिकारी व कर्मचार्यांच्या कामकाजात सुरळीतपणा यावा, यासाठी मनपा आयुक्तांनी तयार करून घेतलेल्या इ-मुव्हमेंट प्रणालीचा अवलंब सोमवार (दि.15)पासून करण्यात येणार आहे.
कामाचे निमित्त करून बर्याच वेळा अधिकारी व कर्मचारी सातत्याने जागा सोडून इतरत्र वावरत असल्याचे चित्र होते. यामुळे कार्यालयीन कामांचा बर्याच वेळा खोळंबा होत असल्याचे दिसून येत होते. या प्रकाराला चाप लावण्यासाठी मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी इ-मुव्हमेंट प्रणालीचे स्वॉफ्टवेअर तयार करून घेतले होते. त्याचे अवलंबन करणे बाकी होते.
विभागीय महसूल आयुक्त व मनपा प्रभारी राधाकृष्ण गमे यांनी अधिकार्यांच्या गैरहजेरीची गंभीर दखल घेत ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार येत्या सोमवारपासून ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे.
या प्रणालीचा अवलंब न करणार्या कर्मचारी व अधिकार्यांच्या कार्यप्रणालीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार बेजबाबदार वर्तनाचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
-विजयकुमार मुंडे, उपायुक्त उद्यान व आयटी विभाग
कार्यप्रणाली अशी
मनपा अधिकारी व कर्मचार्यांनी कार्यालयीन कामासाठी बाहेर जाण्यासाठी आपल्या वरिष्ठांना या स्वॉफ्टवेअरच्या माध्यमातून ‘नोट’ पाठवायची आहे. संबंधित विभाग प्रमुखाने त्यास मान्यता दिल्यानंतरच त्यांचे जाणे योग्य असल्याचे मानले जाणार आहे. विभागप्रमुखांनीदेखील बाहेर जाण्यासाठी कामाचे स्वरूप सांगून त्याबाबत आयुक्तांना नोट पाठवून परवानगी मागायची आहे.