Video : महाराष्ट्राच्या चेरापुंजीत पाण्यासाठी दाही दिशा; दोन किमीवरील रेल्वे बोगद्यातून झिरपणाऱ्या पाण्यावर आहे भिस्त....

व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसू शकतो...
Video : महाराष्ट्राच्या चेरापुंजीत पाण्यासाठी दाही दिशा; दोन किमीवरील रेल्वे बोगद्यातून झिरपणाऱ्या पाण्यावर आहे भिस्त....

नाशिक । प्रशांत निकाळे Nashik

सध्या देशात आझादी का अमृतमहोत्सव सुरू आहे. देशात महाराष्ट्रानेदेखील विकासाचा उच्चांक गाठला आहे. नाशिक जिल्हाही त्याला अपवाद नाही. मात्र इगतपुरी तालुक्याची ( Igatpuri Taluka ) परिस्थिती काही वेगळीच आहे. सरासरी 3300 मि.मी. पावसाची सरासरी असलेला हा तालुका तहानलेलाच(Water scarcity ). इगतपुरीपासून अगदी दोन ते तीन किलोमिटर आणि मुंबई-आग्रा महामार्गापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला कथृवांगणपाडा (Kathruvanganpada ) या परिस्थितीला अपवाद नाही....

एकीकडे इगतपुरी नगर परिषद ( Igatpuri Town Council )मोठ्या थाटामाटाने 24 तास भावलीची पाणी योजना इगतपुरीत चालू करत असताना दुसरीकडे इगतपुरी आदिवासी तालुक्यातील कथृवांगन पाड्याची वेगळीच व्यथा आहे. हात धुणे तर सोडाच, प्यायला एक घोट पाणी सुध्दा येथील आदिवासी बांधवांना मिळेनासे झाले आहे. परिस्थिती अशी की उंदिर, साप मेलेल्या टाकीतील पाणी येथील लोकाना प्यावे लागत आहे.

हा पाडा इगतपुरी नगर परिषदेच्या हद्दीत येतो. सुमारे 27 वर्षांपूर्वी या पाड्याचा समावेश नगर परिषदेत करण्यात आला. परंतू परिस्थिती जैसे थे. या पाड्यात एकुण 45 घरे आहेत. ज्यात जवळजवळ 200 लोक वस्ती करुन राहतात.पाणीपुरवठ्याच्या नावाखाली नगरपरिषदेने सात वर्षांपूर्वी दोन नळ कनेक्शन दिले. जवळच एका जुन्या टाकित हे पाणी साठवले जाते.पंधरा दिवसात एक वेळा जास्तीत जास्त 20 मिनिटे पाणीपुरवठा केला जातो असे येथील आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे आणि सध्या तेही मिळत नसल्याचे सांगण्यात आले. मागील काही दिवसांपासून येथे तळेगाव येथील विहिरीतून पाणी सोडण्यात येत होते. मात्र हे पाणी गढूळ, उंदीर,साप मेलेले आणि केस असलेले येत असल्याचे येथील महिलांनी सांगितले.

घडलेला प्रकार येथील रहिवाशांनी नगर परिषदेचे नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी वर्गाला आणि आमदारांना सांगितला, मात्र कोणतीही दखल घेतली गेली नाही.सध्या पाड्यावरील स्त्रिया 2 किलोमिटर रेल्वेरुळ ओलांडून जीव धोक्यात घालून महामार्गावरील एका हॉटेलचे सांडपाणी झिरपूण ज्या रेल्वे हद्दीच्या मोरीत जमा होते तेथून आणि पर्यायी महामार्गालगत असलेल्या धक्कयातून पायपीट करत, जीवावर खेळत पाणी आणत आहेत. हे पाणीही एका नैसर्गिक स्त्रोतांतून उपलब्ध होत आहे.येथील आदिवासी बांधवांनी प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. मागिल कित्येक वर्षांचा वनवास आता संपविण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा येथील आदिवासी बांधवांनी दिला आहे.

सध्या आम्ही रेल्वे रुळालगतच्या मोरीमधून पाणी आणतो. हे पाणी महामार्गालगत असलेल्या हॉटेलमधून झिरपते आणि खाली येते. हे पाणी आम्ही पिण्यासाठी वापरतो. नगरपरिषदेने पाड्यांमध्ये एक टाकी बांधली आहे. त्यातून एक नळ कनेक्शन दिले आहे. पण पाणी मात्र महिन्यात एकदा येते. त्यातही घाण असते. काही दिवसांपूर्वी टाकी खोलली असता त्यात मेलेला साप, उंदीर आढळले. असे पाणी आम्ही प्यायलो.

कल्याणी भालंगे, स्थानिक महिला.

मागील 25 दिवसांपासून पाड्याला पाणीपुरवठा झालेला नाही. वेळोवेळी निवेदन देऊनही इगतपुरी नगरपरिषदेने काहीच हालचाल केलेली नाही. येथील परिस्थिती नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक सर्वांना माहिती आहे, तरीही कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. आम्हाला अशा विदारक स्थितीतून जावे लागत आहे.

अनिल भोईर, स्थानिक

Related Stories

No stories found.