ग्रामीण भागातील शाळांचा निर्णयही आठवडाभर लांबणीवर

ग्रामीण भागातील शाळांचा निर्णयही आठवडाभर लांबणीवर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या विषाणूमुळे नाशिक महापालिकेने (Nashik NMC) शहरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकल्यानंतर, जिल्हयाच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णयही आता लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती...

शासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून, याबाबत आठवडाभरात निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शाळा नेमक्या कधी सुरू होणार? याकडे आता पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले आहे.

राज्य शासनाने (State Government) करोनाचा नवीन विषाणू आढळल्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध लादले असल्याने शाळा सुरु होणार की नाही? याबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालकांमध्ये संभ्रम होता. अखेर शिक्षण विभागाने राज्यात १ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्यास मान्यता दिली.

पहिल्या टप्प्यातील शाळा व महाविद्यालये सुरु झाल्यानंतर बुधवारी (दि. १) डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याची तयारी प्राथमिक शिक्षण विभागाने (Education Department) केली होती. मात्र, करोनाच्या नव्या ओमिक्रॉन या विषाणूमुळे नाशिक महापालिका प्रशासनाने शाळा १० डिसेंबरनंतर सुरू करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकललेला असला तरी, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाने शाळा १ डिसेंबरला सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यात शाळा सुरू करण्याबाबतचे शासनाचे मार्गदर्शन प्राप्त झाले आहेत. यात प्रामुख्याने सर्व शिक्षकांचे व सेवकांचे लसीकरण पूर्ण करावे, विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये, विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे, शाळेत स्वच्छता व निजंर्तुकीकरण करावे, वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था करावी, बैठक व्यवस्थेमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर असावेत, प्रत्येक शाळेत वैद्यकीय मदत कक्ष सुरु करावा आदी सूचनांचा समावेश आहे.

प्रत्यक्षात या सूचनांचा अभ्यास करावा लागणार आहे. शाळा असलेल्या गावांमध्ये करोना रूग्ण आहे का?, शिक्षकांचे लसीकरण झाले आहे का?, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर पाळणे शक्य होणार आहे का? आदींची माहिती घेऊन योग्य ते नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी काही दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. सर्व नियोजनाचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी स्पष्ट केले. साधारण आठवडभरानंतर यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत शासनाचे मार्गदर्शन आले आहे. या मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करून शाळांच्या सुविधा आहे की नाही याचा गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. करोनाच्या सुविधा शाळांपर्यंत पोहचविण्यासाठी कालावधी लागणार आहे. त्यामुळे आठवडाभरात हा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. -

- राजीव म्हसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, नाशिक.

Related Stories

No stories found.