
मुंबई | Mumbai
दहावी आणि बारावी बोर्डाच्या (10th and 12th Board) परीक्षा लवकरच येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बोर्डाकडून परीक्षांच्या योग्य संचलनाच्या दृष्टीने वेळोवेळी निर्णय आणि सूचना जारी केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) दहावी आणि बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. बोर्डाने परीक्षेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय आता रद्द केला आहे.
कोविड (covid) काळात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका नीट वाचून घेता यावी तसेच, पेपर कसा सोडवायचा यासाठी विचार करण्यासाठी दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिली जायची. मात्र, आता बोर्डाने हा निर्णय रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. दरम्यान दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दहा मिनिटाचा वेळ वाढवून द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य (State of Maharashtra) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गेल्या काही परीक्षांच्या (Exam) प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत होत्या. त्यामुळे गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने परीक्षेच्या दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे परीक्षेच्या कालावधीत प्रश्नपत्रिका हातात आल्यावर सुरुवातीच्या दहा मिनिटात प्रश्नपत्रिका वाचावी लागणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निर्णयावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर म्हणाले, कॉपीमुक्त महाराष्ट्राचे अभियान राबवले जात आहे. १० मिनिटांच्या गोल्डन वेळेत पेपर लिक होऊ नये, यादृष्टीने हा प्रयोग केलेला आहे. विद्यार्थ्यांना अडचण करण्याचा हेतू नाही'.
ऑनलाइन शिक्षण (Education) सुरु असताना गेल्या वर्षीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला होता. मात्र, यंदा संपूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा होणार असल्याने पेपर वेळेत पूर्ण होईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना वेळेत पेपर पूर्ण करावा लागणार आहे.