‘अग्निपथ’च्या नावाखाली तरुणांची क्रूर थट्टा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

चार वर्षाच्या देश सेवेनंतर पुन्हा बेरोजगारीत ढकलण्याचा डाव
‘अग्निपथ’च्या नावाखाली तरुणांची क्रूर थट्टा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

‘अग्निपथ’ ( Agnipath )या गोंडस नावाखाली लष्करी सेवेत केवळ ४ वर्षांची नोकरी (Only 4 years of service in the military) म्हणजे तरूणपिढीचे भवितव्य अंधःकारमय करणारी आहे. या तरुणांना चार वर्षाची सेवा करून पुन्हा बेरोजगारीचा सामना करावा लागणार आहे. हा निर्णय तरुणांची क्रूर थट्टा करणारा आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole)यांनी शुक्रवारी केली.

दरवर्षी २ कोटी नोकरी देण्याचे नरेंद्र मोदी यांचे आश्वासन निवडणुकीतील जुमलाच ठरले असून नोकरीच्या नावावर तरुणवर्गांची फसवणूक केली आहे. सध्या केंद्र सरकारच्या ६२ लाख २९ हजार जागा रिक्त आहेत, त्यातील भारतीय सेनेमध्ये २ लाख ५५ हजार जागा रिक्त आहेत. यातील फक्त ४६ हजार जागा भरती करण्याचा निर्णय मोठा गाजावाजा करून घेतला, असे पटोले म्हणाले.

सहा महिन्याचे प्रशिक्षण आणि त्यानंतर साडेतीन वर्षांची नोकरी तिही केवळ ३०-४० हजार रुपये पगार, सुरक्षेची कोणतीही हमी नाही, भविष्याची तरतूद नाही. चार वर्षाच्या नोकरीनंतर हे तरूण पुन्हा लष्करी सेवेत काम करू शकणार नाहीत. लष्करीसेवेतून बाहेर आल्यानंतर त्यांना सुरक्षा रक्षकाची नोकरी करावी लागले किंवा रोजीरोटीसाठी वणवण भटकंती करावी लागेल. त्यामुळे मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय कोट्यवधी तरुणांच्या भविष्याशी खेळ असून ‘अग्निपथ’च्या नावाखाली सुरु असलेला ‘जुमलापथ’ तरुणांना मान्य नाही हे देशभर सुरु असलेल्या तीव्र आंदोलनातून स्पष्ट दिसत आहे, असे पटोले म्हणाले.

देशाच्या सीमांचे रक्षण करताना आपल्या प्राणांची पर्वाही आमचे जवान करत नाहीत. कोणत्याही पक्ष, संघटनेपेक्षा आमचे जवान महत्वाचे आहेत. त्यांच्या भवितव्याशी खेळ म्हणजे देशाच्या सुरक्षेशी केलेला समझोता आहे. मोदी सरकारचा हा निर्णय केवळ जवानांपुरताच मर्यादीत नसून देशाच्या सार्वभौम सुरक्षेचा प्रश्न आहे. देशाच्या सुरक्षेशी कसलीही तडजोड आम्हाला मान्य नाही. मोदी सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी पटोले यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com