राज्यात खडसेंची वाढली पत, जिल्ह्यात मात्र पानीपत

जळगाव जिल्हा बँक
जळगाव जिल्हा बँक

आमदार एकनाथराव खडसे हे उत्तर महाराष्ट्रातील बाहुबली नेते म्हणवले जातात. भाजपात असतांना खडसेंनी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात भाजपाचे संघटन वाढविले. सन 2015 नंतर मात्र आमदार एकनाथराव खडसे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूंग लागला. मंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर 2019 च्या विधानसभेवरही त्यांना संधी मिळाली नाही. परिणामी त्यांनी गत वर्षभरापूर्वी आमदार एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेशावेळी आ. खडसे यांनी संपूर्ण खान्देशच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचा शब्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना दिला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची कमान आपल्या हातात घेतली. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते यांच्यासाठी हा तोंड दाबुन बुक्क्यांचा मार ठरला. भाजपात असतांना खडसेंशी महाजनांना थेट लढता येत नव्हते.

जळगाव जिल्हा बँक
Breaking # भाजपा-शिंदे गटाच्या साथीने पवारांनीच उलथविली राष्ट्रवादीची सत्ता

पण राष्ट्रवादी प्रवेशानंतर महाजनांनी वेळोवेळी त्यांच्या विरोधात दंड थोपटले. त्याला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांची आणि आता युवा नेतृत्व म्हणून उभरणारे आमदार मंगेश चव्हाण यांची साथ मिळाली. हे सारे सुरू असतांना राज्यात विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर खडसेंनी देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावर जोरदार प्रहार केले. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे घोटाळे बाहेर काढल्याने खा. शरद पवार यांच्या सूचनेवरून नुकतेच त्यांना विधान परिषदेचे गटनेतेपद बहाल करण्यात आले. गटनेतेपद मिळाल्याने साहजिकच राज्याच्या राजकारणात एकनाथराव खडसेंचे वजन नक्कीच वाढले. एकीकडे राज्यात पत वाढलेली असतांना एकेकाळी नेतृत्व केलेल्या जळगाव जिल्ह्यात मात्र खडसेंचे पानीपत व्हायला सुरूवात झाली.

जळगाव जिल्हा बँक
खडसेंकडून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न- प्रदीप पवार

आधी दूध संघ आता जिल्हा बँक गमावली

जळगाव जिल्ह्यातील जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर मंदाताई खडसे आणि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्या माध्यमातून या दोन्ही महत्वाच्या सहकारी संस्थांवर आमदार एकनाथराव खडसे यांचे तब्बल सात वर्ष वर्चस्व राहिले. खडसेंनी सर्व पदे एकाच घरात घेतली हा आरोप त्यांच्यावर सातत्याने होत होता. या दोन्ही सहकारी संस्थांचे राजकारण खडसेंभोवतीच फिरते राहिले. ही बाब हेरून शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपाचे मंत्री ना.गिरीश महाजन यांनी भाजपाचे आमदार मंगेश चव्हाणांना पुढे करून गत वर्षात झालेल्या दूध संघाच्या निवडणुकीत खडसेंचे वर्चस्व संपुष्टात आणले. त्यामुळे एकमेव जिल्हा बँकेवर त्यांचे वर्चस्व होते.

तत्कालीन महाविकास आघाडी असतांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद पुन्हा कन्येकडे सोपविले जावे ही त्यांची इच्छा होती. मात्र, त्यावेळी त्यांना पक्षांतर्गत विरोध झाला आणि शेवटी गुलाबराव देवकर चेअरमन झाले. दुसर्‍या वर्षात आपण सांगू तोच अध्यक्ष होईल, अशी भूमिका निभावणार्‍या खडसेंना शह देण्यासाठी पुन्हा एकदा दूध संघातील सूत्र अंमलात आणले गेले. दूध संघाच्या निवडणुकीत खडसेंच्या विरोधात गेलेल्या राष्ट्रवादीच्या संजय पवारांनाच आजच्या चेअरमनपदाच्या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी ताकद दिली.

दोन मंत्र्यांची ताकद मिळताच संजय पवारही पुन्हा अ‍ॅक्टीव्ह झाले. महाविकास आघाडीतील चार संचालक फोडून संजय पवारांनी चेअरमनपद मिळविले आणि खडसेंचा याठिकाणी असलेला प्रभावही नष्ट केला. त्यामुळे राज्यात पत वाढलेल्या एकनाथराव खडसे यांचे आधी विधानसभा निवडणूक त्यानंतर जिल्हा दूध संघ आणि आता जिल्हा बँक अशा सर्व ठिकाणी पानीपत झाले असेच म्हणावे लागेल!

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com