Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या65 वर्षीय वृद्ध महिलेच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक

65 वर्षीय वृद्ध महिलेच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक

मनमाड । प्रतिनिधी Manmad

बँकेतून पेन्शनचे पैसे (Pension’s money)काढून घरी जाणार्‍या वृध्द महिलेला तीन महिलांच्या टोळीने लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज (बुधवार) शहरातील चौकात घडली. बॅगला ब्लेडने फाडून त्यातील रक्कम चोरून महिलांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र 65 वर्षीय वृद्ध महिलेने या महिलांचा धाडसाने प्रतिकार करीत नागरिकांच्या मदतीने तिन्ही महिलांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. विमलबाई गुंडगळ ( Vimalbai Gundgal )असे या वृद्ध महिलेचे नाव असून तिने दाखविलेल्या धाडसाचे सर्वत कौतुक होत आहे.

- Advertisement -

शहरालगत असलेल्या वंजारवाडी येथील विमलबाई गुंडगळ (वय 65) या रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. स्टेट बँकेत पेन्शनचे पैसे काढण्यासाठी त्या आल्या होत्या. 14 हजार रुपये बँकेतून काढल्यानंतर रक्कम पिशवीत ठेवून त्या सराफाकडे गेल्या मात्र दागिने तयार झाले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र बँकेतून पैसे काढल्यापासून तीन महिला त्यांच्यावर पाळत ठेवत त्यांचा पाठलाग करीत होत्या.

विमलबाई थंड पेय घेण्यासाठी ज्यूस सेंटरमध्ये गेल्यावर या महिला देखील तेथे आल्या आणि ज्या बाकावर विमलबाई बसल्या होत्या त्याच्या मागच्या बाजूला तिन्ही महिला बसल्या आणि त्यांनी अलगद मागून पिशवीला ब्लेडने फाडून त्यातील रक्कम बेमालुनपणे काढून घेत पसार होण्याचा प्रयत्नात असतांनाच विमलबाईंना शंका आल्याने त्यांनी पिशवी तपासली असता त्यातील रक्कम गायब होती.

सदर रक्कम या महिलांनीच लंपास केली असावी असा संशय येवून त्यांनी आरडाओरडा करताच तिन्ही चोरट्या महिलांनी पळ काढला मात्र विमलबाईंनीही त्यांचा पाठलाग करत त्यांना भर बाजार पेठेत धरलं आणि तुम्ही माझे पैसे चोरले ते परत करा अशी मागणी केली मात्र आम्ही पैसे चोरलेच नाही असा पवित्रा या महिलांनी घेतला.

या आरडाओरडीने लोकांची गर्दी झाली होती. पैसे मिळत नसल्याने विमलबाईंनी एका महिलेस चोप देताच ती घाबरली आणि तिने चोरलेली रक्कम रस्त्यावर टाकून पसार होण्याचा प्रयत्न केला मात्र विमलबाईच्या मदतीला सचिन माकुने,अश्पाक शेख,शशी देसाई आणि आरिफ पठाण धावून आले.तिकडे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने तिन्ही महिलांना ताब्यात घेतले.

गोरीबाई सिसोबिया, रीमा सिसोबिया आणि शबनम सिसोबिया अशी या संशयित महिलांची नवे असून त्यांच्या सोबत एक लहान मुलगा देखील आहे या तिन्ही महिला पाचोरा तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. विमलबाई या वृद्ध महिलेने दाखविलेल्या धडसामुळे तीन संशियत चोरट्या महिला पोलिसांच्या हाती लागल्या असून त्या सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता पोलिसांना व्यक्त केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या