Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापुलवामा हल्ल्याचे राजकारण करणाऱ्यांना देश विसरणार नाही - पंतप्रधान

पुलवामा हल्ल्याचे राजकारण करणाऱ्यांना देश विसरणार नाही – पंतप्रधान

दिल्ली । Delhi

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात आहे. यासाठी नरेंद्र मोदी गुजरातमध्ये आहेत. मोदींनी केवडिया येथील “स्टॅच्यू ऑफ युनिटी’जवळ जाऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. पाकिस्तानने पुलवामा हल्ल्याची कबुली दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देताना विरोधकांवर निशाणा साधला आहे. मोदींनी यावेळी सिव्हील सर्व्हिसेस प्रोबेशनर्सना देखील संबोधित केलं. काही लोक दहशतवादाचं जाहीर समर्थन करत असून, ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

पाकिस्तानने पुलवामा हल्ल्याची कबुली दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देताना विरोधकांवर निशाणा साधला आहे. ‘आपण सर्वांनी हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, देशाची सुरक्षाही सर्वोच्च स्थानावर आहे. जेव्हा आपण आपल्या राष्ट्राच्या हिताबद्दल विचार करू, तेव्हा आपली प्रगती होईल. आपल्या राष्ट्राची सुरक्षा करणाऱ्या जवानांचे मनोधैर्य खचू नये, असे कोणतेही विधान राजकीय पक्षांनी करू नये. आपल्या स्वार्थासाठी केलेल्या कृत्यांमुळे देशविरोधी शक्तींना ताकद मिळेल, यामुळे देशासह तुमच्या पक्षाचेही यात नुकसान आहे’, असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला.

पुलवामा हल्ल्याबाबत उल्लेख करताना पंतप्रधान मोदी भावुक झाले. ‘पुलवामा हल्ल्यात आपले जवान शहीद झाले, या घटनेमुळे संपूर्ण देशावर दु:ख होते. पण काही लोकं या दुखाच्या प्रसंगात सहभागी झाले नाही. ही लोकं यातही आपला स्वार्थ शोधत होती. त्यावेळी या लोकांनी कसे कसे आरोप केले हे देश विसरणार नाही. देशावर एवढे मोठे संकट कोसळले असताना राजकीय चिखलफेक करण्यात आली’, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

आज भारताने आपल्या सीमेच्या सुरक्षेबाबत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सीमालगत भागात रस्ते, पूल तयार केले जात आहे. भारताच्या भूमीवर जी लोकं वाकड्या नजरेनं पाहत आहे, त्यांना यातून उत्तर मिळाले आहे. सीमेवर आज शेकडो किमी रस्ते निर्माण कार्य सुरू आहे. अनेक पूल, बोगद्यांची कामं सुरू आहे. आज आपल्या सुरक्षेसाठी भारत पूर्णपणे तयार आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी चीनचा उल्लेख न करता टोला लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या