क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अदानी, लोढांच्या फायद्यासाठी - नाना पटोले यांची टीका

क्लस्टर डेव्हलपमेंट, आयटी पार्कच्या जमीन वापर योजनेतील बदलाविरोधात न्यायालयात जाणार
क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अदानी, लोढांच्या फायद्यासाठी - नाना पटोले यांची टीका

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुंबई आणि परिसरातल्या क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेत प्रिमियममध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. धारावीचा पुर्नविकास करणा-या अदानी आणि बिल्डर मंत्री लोढा यांच्या सारख्या मोठ्या उद्योगपतींच्या फायद्यासाठीच ही योजना आणली आहे. समूह विकासाला सवलत ही सामूहिक कमिशनखोरी आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी येथे केला.याविरोधात काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

राज्य मंत्रिमंडळाने अलिकडेच क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेत प्रिमियममध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत सडकून टीका केली. क्लस्टर डेव्हलपमेंट ही योजना फक्त सामूहिक विकासासाठीच का? एक-दोन इमारतींच्या पुर्नविकासासाठी ही सवलत का नाही? तसेच आयटी पार्कच्या जमीन वापराबाबत शिंदे फडणवीस सरकारने एक निर्णय घेतला असून आता आयटी एसईझेड मधील ६० टक्के क्षेत्राचा आयटीसाठी आणि ४० टक्के जागेचा गैर आयटी क्षेत्रासाठी (पूरक सेवांसाठी) वापर करण्यात येणार आहे. अगोदर फक्त २० टक्के जागेचा वापर गैर आयटी (पूरक) सेवांसाठी करण्याला परवानगी होती. ती वाढवून आता ४० टक्के केली आहे. याचा फायदा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर आणि अंबरनाथ या परिसरातील मोजक्या ४ ते ५ बिल्डरांना आणि उद्योगपतींना होणार आहे. या निर्णयाविरोधातही काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागणार असल्याचे पटोले म्हणाले.

शिंदे फडणवीस सरकार म्हणजे घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ अशी परिस्थिती आहे. घोषणा, इव्हेंट, जाहिरातबाजी यापलीकडे या सरकारचे दुसरे कोणतेही काम नाही. राजकीय सभा असो किंवा मंत्रिमंडळाची बैठक सगळीकडे फक्त घोषणाबाजी सुरु आहे. ३० मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारची हीच कार्यपद्धती दिसून आली. अनेक लोकोपयोगी घोषणा केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. ‘नमो’ शेतकरी महासन्मान योजना ही त्यापैकी एक आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेच्या अनुदानात थोडी भर घालून आम्हीच शेतक-यांना दरवर्षी १२ हजार रूपये देत आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न शिंदे सरकार करत आहे. ही नवी योजना म्हणजे नमो फसवणूक योजना आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असा सवाल पटोले यांनी केला.

आज राज्यातला शेतकरी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उद्ध्वस्त झाला आहे. कांदा, कापूस, सोयाबीन सह कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. सरकारने वारंवार घोषणा केल्या पण अद्याप शेतक-यांना मदत मिळालेली नाही. या सरकारच्या घोषणा फक्त प्रसिद्धीसाठी असतात, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र होत नाही, अशी टीका पटोले यांनी केली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com