आठ दिवसांपासून शहराच्या तापमान वाढ

पारा 33 वर; नाशिककरांची काहिली
आठ दिवसांपासून शहराच्या तापमान वाढ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गेल्या आठ दिवसांपासून शहराच्या तापमान वाढीमध्ये कमालीची वाढ ( Increase in Temperature) अनुभवायला मिळत आहे. 23 ऑगस्टला 25 अंश सेल्सिअस तापमान होते. त्यात तब्बल 8 अंशांनी वाढ होऊन काल (दि.31) ते 33 अंशांवर पोहोचले होते. काल दुपारी हवामान ढगाळ होते. काही काळ पाऊसही झाला. या संमिश्र वातावरणाने शहरात दिवसभर उकाडा जाणवत होता. नाशिककरांची उकाड्याने काहिली झाली. मध्येच येणार्‍या पावसाच्या सरींनी वातावरणात थोडा गारवा निर्माण केला होता. मात्र, आठ दिवसांत तापमानाचा पारा चढू लागल्याने आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

यंदा पावसाळ्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. जुलै महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असल्याने आता गेल्या आठ दिवसापासुन कमाल तापमानात वाढ होत आहे. किमान तापमानात एक-दोेन अंश सेल्सिअसची वाढ सतत होत आहे. मागील सलग दोन दिवस नाशिक शहराचे तापमान 30 अंश सेल्सिअस होते. आज मात्र तापमानाच्या पार्‍याने उसळी घेऊन ते अचानक 33 अंशापर्यंत पोहोचल्याने घामाच्या धारा लागल्या होत्या. आताशी सप्टेंबर महिना उजाडला आहे. पुढे येऊ घातलेला 'ऑक्टोबर हीट' कसा असेल याचा अंदाज बांधायला नागरिकांनी आतापासूनच सुरुवात केली आहे.

ग्रामीण भागात धुक्याची चादर

गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागात पाऊस तर काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. बदलत्या हवामानात तापमानवाढ झाल्याने उन्हाची काहिली होत आहे. वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. आज (दि. 31) सकाळी जिल्ह्याच्या काही भागात दाट धुक्याची चादर पसरली होती. निफाड तालुक्यातील आंबेगाव परिसर आणि वाटही धुक्यात हरवल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सूर्यदर्शन झाल्यानंतरही 5-6 फुटावरचेही दिसत नव्हते. असेच वातावरण राहिल्यास ते खरीप हंगामाला त्रासदायक ठरू शकते, असे तज्ञांनी सांगितले. सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास नाशिकच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. सिडको, मुंबई नाका परिसरात पावसाचा जोर अधिक होता. शहराच्या उर्वरित भागात मात्र वातावरण कोरडे होते. त्यामुळे वातावरणातील उष्मा वाढला होता.

तापमानील वाढ

दिनांक- अंश सेल्सियस

23/08/2022- 25.06

24/08/2022- 27.06

25/08/2022- 28.08

26/08/2022- 27.06

27/08/2022- 28.07

28/08/2022- 29.04

29/08/2022- 30.03

30/08/2022- 30.09

31/08/2022- 33.03

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com