Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री आज सिरमची पाहणी करणार

मुख्यमंत्री आज सिरमची पाहणी करणार

पुणे । प्रतिनिधी Pune

करोनावरील ‘कोविशिल्ड’ लसीचे उत्पादन करणार्‍या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

- Advertisement -

मृत्यू झालेले हे बांधकाम मजूर असून तीन जण परप्रांतीय तर दोघे पुण्यातील रहिवासी आहेत. आग लागलेल्या ठिकाणी कोविशिल्ड लसीचे उत्पादन किंवा साठवणूक होत नव्हती. पूर्णपणे दुसर्‍या ठिकाणी हे काम सुरू होते. पण दुर्दैवाने पाच जणांना जीव गमवावा लागला असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

मुख्यमंत्री आज पाहणी करणार

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी अदर पूनावाला यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. त्यानंतर आज शुक्रवारी उद्धव ठाकरे हे सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.

मृतांच्या कुटुंबियांना सिरमकडून मदत

सिरमचे सायरस एस. पूनावाला यांनी एक निवेदन जारी करून या संपूर्ण घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला. सीरमसाठी आजचा दिवस अत्यंत वेदनादायी आहे. आमच्या नवीन निर्माणाधीन इमारतीत लागलेल्या आगीत पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. या सर्वांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा शोकभावना व्यक्त करत पूनावाला यांनी या पाचही कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. नियमानुसार या कुटुंबांना जी रक्कम मिळायची आहे ती मिळेलच, मात्र आम्ही प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत या पाचही मृतांच्या कुटुंबियांना देत आहोत, असे पूनावाला यांनी जाहीर केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या