
नाशिक | प्रतिनिधी Nashik
सिंहस्थ आता अवघ्या तीन वर्षांवर येऊन ठेपला आहे. मागील 7-8 वर्षांमध्ये शहराची व्याप्ती होण्या सोबतच लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सिंहस्थच्या काळात देशभरातील भाविकांच्या आगमनाने संभाव्य वाहतुक कोंडी टाळता येण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या असून, सिंहस्थाच्या अनुषंगाने पूर्व तयारीची कामे लवकर सुरू करावी तसेच शहराच्या बाह्य आणि अंतर्गत रिंगरोडच्या प्रस्तावास लगेचच गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकार्यांना दिल्या.
खा. हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने महिन्याभरापूर्वी शहरातील विविध समस्या आणि लोकाभिमुख विकासकामांसाठी मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात मनपाच्या विविध अधिकार्यांची विशेष बैठक घेण्यात आली होती. यात अनेक विकास कामांचा समावेश होता. या बैठकीचे इतिवृत्त आज प्राप्त झाले असून, शहरातील अनेक विकास कामांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासनाला विशेष सूचना दिल्या आहेत.
शहरवासीयांसाठी महत्वाच्या असलेल्या विकासकामांविषयी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालय प्रशासन स्तरांवरही कामांची वर्गवारी केली आहे. सिंहस्थ उत्सवात वाहतुकीची होणारी कोंडी टाळण्यासाठी शहराच्या बाह्य आणि अंतर्गत रिंगरोड तयार करण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सिंहस्थ उत्सवाच्या अनुषंगाने नाशिक मनपा प्रशासनाने तातडीने पुर्वतयारी सुरू करावी तसेच शेतकर्यांच्या जमिनी भूसंपादित करताना मोबदला देण्याच्या अनुषंगाने टीडीआरचा प्रस्ताव तपासून घ्यावा अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा प्रशासनाला केली आहे.
सदर प्रस्तावांना लगेचच गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका आणि मंत्रालय प्रशासनाला दिल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सिांगितले आहे.
या बैठकीत घेतलेले निर्णय
मनपाच्या भाडेतत्त्वावर घेतलेल्या मिळकतींना नाममात्र भाडे आकारण्यात यावेत, बांधकाम परवानगी प्रक्रिया ऑफलाइनच असावी, कर्मचार्यांची भरती करण्यात यावी, ग्रीन फिल्ड प्रकल्प रद्द करून त्याऐवजी अनुषंगिक विकास कामे करावीत, सिडकोतील इमारती फ्री व्होल्ड कराव्यात, ठाणे शहराप्रमाणे नाशिकच्या रि डेव्हलपमेंट प्रकल्पांसाठी ओव्हर आणि अब्होव एफएसआय मिळावा, बारा मीटर प्रमाणे नऊ मीटर रस्त्यांलगतच्या इमारतींना उंचीचा लाभ मिळावा, मनपा हद्दीलगतच्या नाशिक प्राधिकरण अंतर्गत असलेल्या गावांना मनपा प्रशासनाने मुलभूत सुविधा पुरवाव्यात, नाशिक प्राधिकरणाच्या समितीच्या सदस्यांचे शासनामार्फत नामनिर्देशन करण्यात यावे, दारणातील पाणी नाशिकरोड येथील जलकुंभात टाकण्यासाठी थेट पाईपलाईनच्या प्रस्तावास आणि शहरातील भुयारी गटार योजनांच्या प्रस्तावास तातडीने मान्यता मिळावी, किकवी धरणासाठी निधीची तरतूद करावी, नदी संवर्धन, मेट्रो, नासडीचे पुनर्जीवन करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून द्यावी या विषयांना मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली आहे.