विहिरीत आढळला बेपत्ता युवकाचा मृतदेह

आत्महत्या की घातपात पोलीस तपास सुरु
विहिरीत आढळला बेपत्ता युवकाचा मृतदेह

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो ( Nandgaon Sado )येथील भूषण गणेश भागडे, वय २३ ह्या बेपत्ता युवकाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी नांदगांव सदो येथील समृद्धी महामार्गालगत एका विहिरीत सापडला आहे. हा युवक १५ जानेवारीपासून बेपत्ता झाल्याबाबत त्याच्या वडीलांनी इगतपुरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

नांदगाव सदो गावाजवळ एका विहिरीत हा युवक मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती इगतपुरी पोलिसांना मिळाली. विहीरीतुन त्याचा मृतदेह क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आला असुन त्यानुसार पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरु केली आहे.

या घटने बाबत नांदगांव सदो येथील या युवकाने आत्महत्या केली आहे का की घातपात आहे याबाबत इगतपुरी पोलिसांकडून सूक्ष्म तपास सुरु करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावरील मजुरी कामाला जातो असे सांगून भूषण घरी परतला नाही म्हणून वडील गणेश पांडुरंग भागडे यांनी बेपत्ता झाल्याची खबर इगतपुरी पोलीस ठाण्यात यापूर्वीच दिली आहे.

काही दिवसांपूर्वी भूषणचे लग्न जमले होते. मनमिळाऊ असणाऱ्या भूषणच्या बेपत्ता होण्यामुळे ह्या भागातील नागरिक चिंतेत होते. आज त्याचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. भुषणचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिक जिल्हा रूग्णालयात पाठविला आहे. इगतपुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com