मोहफुलांवरील बंदी उठवली

राज्यांतर्गत मोहफुलांची वाहतूक करण्यावरील निर्बंध उठविले; मोहफुलांसाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता राहिलेली नाही.
मोहफुलांवरील बंदी उठवली

मुंबई । प्रतिनिधी

राज्य सरकारने मोहफूल गोळा करणे, बाळगणे आणि राज्यांतर्गत मोहफुलांची वाहतूक करण्यावरील निर्बंध उठविले आहेत. त्यामुळे आता मोहफुलांसाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता राहिलेली नाही.

मोहफुलांवर सद्यस्थितीत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ या कायद्याअंतर्गत असलेले निर्बंध हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे.

त्यानुसार आदिवासी विकास विभागाकडून मोहफुले वापरासाठी नविन योजना तयार करण्यात येणार आहेत. या योजनांतर्गत मोहफुलांच्या व्यापारासाठी एफएफ-२ अनुज्ञप्ती आवश्यक असणार आहे.

या अनुज्ञप्ती आदिवासी सदस्य असलेल्या आदिवासी विकास संस्था, महिला बचत गट, सहकारी संस्था, ग्रामपंचायत अशा प्रकारच्या मुंबई मोहफुले अधिनियम १९५० मधील नियम २ सी नुसार मान्यताप्राप्त संस्थांना नविन एफएफ-२ परवाने मिळणार आहेत. या संदर्भातील शासन निर्णयही गृहविभागाने मंगळवारी जारी केला.

दरम्यान, मोहफुले गोळा करणे आणि व्यापावरील जाचक निर्बंध हटवल्याने विदर्भात मोहफुलांच्या झाडांच्या लागवडीला चालना मिळेल. यातून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे रक्षणही होईल. तसेच मोहफुलांवरील प्रक्रिया उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन जनतेला आर्थिक फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com