Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यानिवडणूक लांबल्याने इच्छुकांमध्ये नाराजी

निवडणूक लांबल्याने इच्छुकांमध्ये नाराजी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विविध कारणांनी सतत पुढे ढकलत जाणार्‍या नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला ( NMC Elections )मुहूर्त मिळत नसल्यामुळे आता इच्छुकांमध्ये काही प्रमाणात नाराजी दिसून येत आहे, तसेच सोशल मीडियावर ( Social Media )ज्या जोमाने मागील काही महिन्यांपासून प्रचार सुरू होता तो देखील थंडावळ्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

13 मार्च 2022 रोजी नाशिक महापालिकेतील महापौरांसह सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ संपला तर नाशिक महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा प्रशासक राजवट सुरू झाली. अगोदरच करोना यानंतर ओबीसी आरक्षणामुळे ( OBC Reservation )रखडलेली नाशिक महापालिका निवडणूक पुन्हा लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील सत्ता बदल झाल्यानंतर नव्याने प्रभाग रचना होण्याचे संकेत मिळत असल्यामुळे तसेच मविआ सरकारने वाढवलेली सदस्य संख्या रद्द करण्याच्या निर्णय झाल्यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीला कधी मुहूर्त मिळणार अशी चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असतांना नाशिक महापालिका निवडणुकीसाठी अकरा सदस्यांची वाढ करून तीन सदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. मात्र राज्यात शिंदे व फडणवीस सरकारने आल्यानंतर तीनची प्रभागरचना रद्द करत जुनीच रचना कायम राहील, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती पहायला मिळत असून सर्वत्र संभ्रमवस्था दिसून येत आहे.

महाविकास आघाडीने सत्तेत असताना नगरसेवकांची संख्या वाढवत आगामी महापालिका निवडणुकीसाठी तीनची प्रभागरचना जाहिर केली होती. त्यानुसार नाशिक महापालिकेत नगरसेवक संख्या 122 वरुन 133 पर्यंत पोहचली. मनपाचे तीन सदस्य संख्येनुसार एकूण 44 प्रभागाची रचना केली. मात्र, महाविकास आघाडी पायउतार होताच सत्तेत आलेल्या भाजप – शिंदे गट सरकारने नवीन प्रभाग रचना रद्द केली. त्यामुळे राजकीय पक्षांसह इच्छूक बुचकळ्यात पडले आहेत. 2017 महापालिका पंचवार्षिकनुसार प्रभागरचना कायम ठेवत निवडणुका घ्यायचा की नव्याने फेररचना करायची, या बाबत प्रचंड संभ्रवस्था पहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर शांतता

फेब्रुवारी 2022 मध्ये तसे पाहिले गेले तर नाशिक महापालिकेची निवडणूक होणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. दरम्यान नाशिक महापालिका निवडणुकीसाठी मागील वर्षापासून विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह नेत्यांनी व इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात तयारीला प्रारंभ केला होता. यामध्ये छोटे पक्ष तसेच अपक्षांचा देखील समावेश आहे. यामुळे इच्छुकांनी सोशल मीडियाचा जोरदार वापर सुरू केला होता. फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम आदी माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. मात्र नाशिक महापालिका निवडणुकीला मुहूर्त मिळत नसल्यामुळे तसेच सतत विविध कारणांनी पुढे ढकलत जाणारी निवडणूक कधी होणार हे निश्चित नसल्यामुळे आता सोशल मीडियावर देखील शांतता पसरली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या