उद्यानांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचा काणाडोळा

देखभाल होत नसल्याने नागरिकांंमध्ये संताप
उद्यानांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचा काणाडोळा

नाशिक | देशदूत चमू Nashik

नाशिक शहर परिसरातील विविध भागांमध्ये महापालिकेची लहान-मोठी एकूण 524 उद्याने( Gardens )आहेत. मात्र नियमितपणे त्यांची देखभाल होत नसल्यामुळे अनेक उद्यानांची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक उद्यानांमध्ये गवत वाढले आहे तर खेळण्यादेखील तुटून पडल्या आहेत. काही ठिकाणी नागरिकांना जाण्यासाठी मार्ग सुद्धा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहरातील उद्यानाकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नाशिक महापालिकेच्या ( NMC) माध्यमातून शहरात हरित क्षेत्र वाढावे, यासाठी मोठ्या प्रमाणात काम करण्यात येत आहे. फक्त शहरात एक लाख वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवून काम देखील सुरू झाले आहे. पुण्याहून यासाठी विशेष वाहनाद्वारे रोपे देखील मागविण्यात आली आहेत.पांडवलेणी परिसरात आतापर्यंत सुमारे पंधरा हजार वृक्ष लावण्यात आलीे आहेत.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिका एकीकडे प्रयत्न करीत असले तरी दुसरीकडे त्यांच्या स्वतःच्या उद्यानाकडे मात्र, अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील अनेक उद्यानांची दुरवस्था झाली आहे. शहरातील महापालिकेच्या सर्व सहा विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्याने आहेत. जुने नाशिक भागातील उद्यानांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाशेजारी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे अस्तित्व नष्ट होताना दिसत आहे. या ठिकाणी महापालिकेने ऑक्सिजन प्लांट उभारले असल्यामुळे उद्यानाच्या बराच भाग त्याच्यात गेला आहे तर उर्वरित भागांमध्ये सफाई कर्मचारी देखील येत नाही.त्यामुळे उद्यानाची देखभाल होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यात लावण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या खेळणी चोरीस गेल्याचे समजते.यामुळे खेळणी नावाची गोष्ट देखील त्यात दिसत नाही. लावण्यात आलेले विविध प्रकारचे वृक्ष मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यांची छाटणी वेळेवर होत नसल्यामुळे अस्तव्यस्त स्वरूपात दिसत आहे.

दुसरीकडे या उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ अनेक गॅरेज असल्यामुळे जाण्यासाठी मार्ग देखील मिळत नाही. प्रवेशद्वाराची देखील दुरवस्था झाली आहे. पाखल रोड भागातील उद्यानात झोके असले तरी त्यावर बसण्याची सोय नाही. अनेक खेळण्या तुटल्या आहेत. या ठिकाणी पूर्वी छोटी ट्रेन होती, मात्र लॉकडाऊनच्या काळात उद्यानाचे नूतनीकरण झाले व ही ट्रेन देखील काढून देण्यात आली, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. छत्रपती शिवाजी विद्यालयाची देखील तीच अवस्था आहे. नियमित देखभाल होत नसल्यामुळे अनेक सुविधा बंद पडल्या आहेत तर पाण्याचा फवारा देखील बंद आहे.

पश्चिम विभागात आजारांना निमंत्रण

नाशिक पश्चिम विभागात दोन आमदार, एक माजी महापौर, एक उपमहापौर, चार माजी स्थायी समिती सभापतींना मोठा निधी देऊन मोठमोठ्या नेत्यांच्या नावाने उद्याने विकसीत केली. मात्र केवळ देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. आता तर नगरसेवकही नसल्याने या उद्यानांना कोणी वालीच राहिला नाही अशी स्थिती आहे. पावसामुळे उद्यानातील गवत सतत वाढत आहे.

जनावरे थेट या उद्यानात येत असल्याने या उद्यानाचे जणू कुरणच झाले की काय असा प्रश्न पडत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने डबके साचून डास वाढत आहेत. त्यामुळे येथे सायंकाळी येऊन बसणे म्हणजे डेंग्यू, चिकनगुनीया, मलेरिया आजार घेऊन जाण्यासारखे होत आहे. आमदार, खासदारांनी आपल्या निधीतून ग्रीन जीम उभारुन दिल्या. मात्र त्यांचे सुटे भाग चोरीस जात आहेत.त्यामुळे त्यावर व्यायाम करणे म्हणजे दुसरे दुखणे मागे लावून घेण्यासाखे झाले आहे. येथे प्रमोद महाजन, कुलकर्णी उद्यान, बाल गणेश उद्यान,नाना-नानी पार्क यासारखी चांगली उद्याने निश्चित आहेत.

पाहुण्यांंना, बालगोपाळांंना ही उद्याने निश्चित भुऱळ घालतात. प्रेमीयुगलांंनाही हे हक्काचे ठिकाण आहे. मात्र, त्यातच मद्यपी गर्दी करतात. त्यांचा त्रास इतरांना होत आहे. उद्यानात झाडे, गवत इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले की उद्यानात प्रवेश करणे धोक्याचे वाटू लागते.उद्यानातील खेळण्यांचीही मोडतोड झाल्यानंतर त्वरित दुरुस्तीची गरज असते. मात्र, त्याकडे कानाडोळा होत असल्यानेच चांंगल्या उद्यानांंना दृष्ट लागत आहे. ती दृष्ट एकदा नव्या प्रशासकांनी काढण्याची गरज आहे.

सातपूर विभागात जनावरांचा वावर

सर्वसामान्य नागरिकांना बालगोपाळांच्या विरंगुळ्याचे स्थान म्हणजे उद्यान नागरिकांच्या स्वास्थ्याचा विचार करून प्रशासनाने देखील नागरी वसाहतींच्या तुलनेत उद्यान उभारण्याचा दंडक घातलेला होता. त्या अनुषंगाने शहरात ठिकठिकाणी उद्यानांची उभारणी केली आहे. मनपाच्या प्रशासकीय कार्यात उद्यान विभाग नियुक्त करून त्या माध्यमातून या उद्यानांची देखरेख केली जाते.

मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या उद्देशाला कसा हरताळ फासला जातो याचे चित्र दिसून येते. शहरातील काही उद्याने अतिशय सुरेख वेगळी व्यवस्थित ठेवलेली आहे. मात्र बहुतांश उद्यानांमध्ये उद्यान विभागाच्या कर्मचार्‍यांचे लक्ष नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सातपूर विभागात कामगारनगर, गणेशनगर, सोमेश्वरनगर, महादेववाडी, सातपूर कॉलनी, अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, गंगापूर गाव,सिरीन मेडोज, काळेनगर या भागांमध्ये उद्यान आहेत. यातील निम्मे अधिक उद्याने ही बकाल झाल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी जनावरांचा वावर आहे तर काही उद्यानांमध्ये चिखलाचे साम्राज्य आहे. कुठे खेळणी तुटलेली आहे, कुठे प्रवेशद्वारावरच घाण पडलेली आहे. जंगली गवत वाढल्याने उद्यानात वावरणे ही धोक्याचे झाले आहे.

नवीन नाशकात मद्यपींचा अड्डा

नवीन नाशिक परिसरामध्ये लहान व मोठी अशी 84 उद्याने आहेत. यामध्ये प्रामुख्याने फाळके स्मारक, वासननगर येथील उद्यान ,पाटील नगर उद्यान, सुभाष ंद्र बोस उद्यान, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान, राजमाता जिजाऊ उद्यान, गणेश चौक येथील उद्यान आदी उद्यानांचा समावेश आहे. सध्या महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी देखरेखीचे व दुरुस्तीचे काम सुरू आहेत. नवीन नाशिककरांसाठी उद्यानांमध्ये डोकेदुखी ही प्रामुख्याने गणेश चौक येथील उद्यान व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान या ठिकाणी ठरत आहे. येथे सायंकाळच्या वेळी मद्यपींच्या पार्ट्या सुरू असल्याने या ठिकाणी येणार्‍या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस प्रशासनाची उद्यान परिसरामध्ये गस्त सुरू असते, मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच मद्यपी व टवाळखोर लागलीच पळून जातात. त्यामुळे या उद्यानांमध्ये कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी नवीन नाशिककरांकडून होत आहे.

सुरक्षारक्षक नेमावेत

लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याचे योग्य ठिकाण म्हणजे उद्याने असतात. महापालिकेने मोठ्या प्रमाणात उद्यानांची निर्मिती केली असली तरी नियमित त्यांची देखभाल होत नसल्यामुळे अनेक उद्यानांची दुरवस्था झाली आहे अशा वेळेला नागरिक उद्यानांमध्ये जात नाही. त्यामुळे त्याचा ताबा टवाळखोर मंडळी तसेच व्यसन करणारी मंडळी घेऊन टाकते. त्यामुळे महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात जातात. महापालिकेने सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी.

नदीम शेख, सामाजिक कार्यकर्ता, जुने नाशिक

172 बिगारी, 524 उद्याने

नाशिक पूर्व विभागात 76 उद्याने असून नाशिक पश्चिम 80, नाशिकरोड 124, पंचवटी 113, नवीन नाशिक 84, सातपूर विभाग 47 याप्रमाणे एकूण 524 विद्याने महापालिकेची आहे. यातील मक्तेदारांमार्फत 332 उद्यानांची देखभाल होते तर 192 उद्यानाची देखभाल ही नाशिक महापालिका करते. सध्या 172 बिगारी या सर्व उद्यानांच्या देखभालीसाठी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com