Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यासिंहस्थ कृती आराखडा शासनाला 'या' तारखेला सादर करण्यात येणार

सिंहस्थ कृती आराखडा शासनाला ‘या’ तारखेला सादर करण्यात येणार

नाशिक | प्रतिनिधी

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेद्वारे कृती आराखडा तयार करण्याचे काम गतिमान करण्यात आले आहे.आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर यांनी खाते प्रमुखांना सिंहस्थ विकास कामांचा प्राथमिक आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले. त्यात तीन विभागांनी आराखडा सादर केला. या आराखड्यावर येत्या बुधवारी (दि. ६) उर्वरित विभागांचा आढावा घेऊन एकत्रित अंतिम कृती आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

सिंहस्थाच्या दृष्टीने शहर परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जाणार आहेत. त्यासाठी तयार करण्यात येणारा आराखडा ५ हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता मनपा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. नाशिक व त्र्यंबक येथे दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.

त्यासाठी नाशिक महापालिकेच्या माध्यमातून शहर परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे व विविध प्रकल्पाचे नियोजन करण्याची जबाबदारी असते. राज्य व केंद्र शासनाच्या भरीव निधीतून विकास कामांना मुर्तरुप देण्यात येते.

२०२७ मध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याचे नियोजन मनपास्तरावरून सुरू असून, राज्य शासनाने देखील आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मनपा प्रशासनाने प्रत्येक विभागप्रमुखांना या पूर्वीच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधारे, नवीन आराखडा तयार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार मनपा आयुक्तांच्याच्या मार्गदर्शनाखाली समिती गठीत करण्यात आली.

या समितीचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त प्रदिपकुमार चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यासाठी बांधकाम, पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युत, यांत्रिकी अशा महत्त्वाच्या विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

साधूग्रामसाठी ५०० एकरचा प्रस्ताव

साधुग्रामसाठी ५०० एकरचे नियोजन सिंहस्थासाठीचे साधुग्रामचे आहे. या साधुग्रामसाठी मनपाने ३५० एकर जागेवर आरक्षण टाकलेले असून, त्यापैकी जवळपास ५४ एकर इतकीच जागा मनपाने संपादित केली आहे. इतर जागेवर सिंहस्थाच्या वेळी केवळ सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात आणि सिंहस्थानंतर या जागा पुन्हा संबंधित जागा मालकांकडे दिल्या जातात. मात्र, आता ३५० एकर जागा संपादित करण्यासाठी चार हजार कोटींची आवश्यकता असून, तसा प्रस्ताव शासनाला सादर करत निधीची मागणी केली आहे.

वाहनतळांची संख्या वाढविणार

आढावा बैठकीत मागील सिंहस्थावेळी प्रत्येक विभागाने केलेली कामे व नियोजन सादर करण्यात आले. बाह्य वाहनतळे, साधुग्राम, वीज व पाणीपुरवठा, घाट, रस्ते बांधणी यांची आयुक्तांनी माहिती घेत त्याआधारे डीपीआर तयार करून सादर करण्याचे आदेश खातेप्रमुखांना दिले असून, वाहनांची वाढती संख्या पाहता बाह्य वाहनतळाबरोबरच शहराच्या आसपास मध्य वाहनतळांची संख्या देखील वाढविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

विविध विकास कामे

या कामांना असेल प्राधान्य सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने ५२ किमीचा बाह्य रिंगरोड अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्याचबरोबर नमामि गोदा प्रकल्प, गंगापूर धरण ते शहर अशी थेट पाइपलाईन(२५० कोटीं), मलवाहिका व एसटीपी अद्ययावतीकरण प्रकल्प (३५० कोटीं) ही कामे सिंहस्थाच्या अनुषंगाने महत्त्वाची असून, या कामांचे प्रस्ताव प्रगतिपथावर असून, केवळ शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

येत्या बुधवारी फेरआढावा घेऊन आराखड्याला अंतिम स्वरुप देण्यात येईल आणि त्यानंतर आराखडा राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. कामांचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर राहणार असल्याने ही कामे २०२७ च्या सिंहस्थ पर्वणी पूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने तयारी केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या