Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या भूमीपुजनास फडणवीसांना का टाळले ?

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या भूमीपुजनास फडणवीसांना का टाळले ?

मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आज पार पडत आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थितीत राहणार आहे. मात्र कार्यक्रमापूर्वीच वाद सुरु झाला आहे. सायंकाळी साडेपाच वाजता महापौर निवास, दादर, येथे हा कार्यक्रम होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी संबंधातील बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह भूमिपूजन समारंभ होणार असून त्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या स्मारकासाठी ४०० कोटींचा निधी देण्यात आला असून आज स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन होत आहे

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण नसल्याने भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर मनसेने स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही असे सांगत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

शिवसेना आणि भाजपा यांच्यातील दुरावा वाढत चालला आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचे आमंत्रण न दिल्याचे समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच ठाकरे स्मारकाची घोषणा झाली होती. स्मारकासाठी अनेक परवानग्या देखील त्यांच्याच कार्यकाळात मिळाल्या. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या स्मारकाची घोषणा केली होती. त्यानंतर कागद हस्तांतरण कार्यक्रम पार पडला होता, मात्र आता या स्मारकाचे भूमिपूजन होत असताना देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले आहे. ‌भाजप व शिवसेनेत सध्या सुरु असलेले वाद हे त्यासाठी एक कारण आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टि्वट करत या वादात उडी घेतली आहे. त्यांनी टिवटमध्ये म्हटले आहे की, स्वर्गीय मा.बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही.

असे असेल स्मारक

बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान एका बाजुस तर दुसऱ्या बाजुस अथांग अरबी समुद्र या दोघांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवास या ऐतिहासिक ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. या स्मारकामुळे जगभरातील बाळासाहेबांच्या चाहत्यांची प्रतीक्षा पूर्ण होणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील सुप्रसिध्द वास्तुविशारद श्रीमती आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला. राज्य शासनाने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली. स्मारकासाठी भू वापर व पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून वास्तु उभारणीचा पहिला टप्पा 14 महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या