Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यानको हा दुरावा...!

नको हा दुरावा…!

नाशिक । फारुक पठाण Nashik

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगत येत नाही. गतवर्षी शिवसेना पक्ष फुटला तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अजित पवार यांच्या समर्थक आमदारांनी थेट भाजप-शिवसेना (शिंदे गट) युती सरकारला पाठिंबा दिला.एकीकडे फोडाफोडीचे राजकारण सुरू असताना दुसरीकडे ठाकरे बंधूंनी एकत्रित यावे, अशी साद घालण्यात येत आहे. यासाठी मुंबईत थेट फलकबाजीदेखील करण्यात आली आहे. मात्र याबाबत आतापर्यंत दोन्ही ठाकरेंनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र असे झाले तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना करून मुंबईच्या मराठी माणसाला मानसन्मान व एक दर्जा मिळवून दिला. त्यानंतर हळूहळू शिवसेनेची वाटचाल पुढे जात अवघ्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या शाखा सुरू झाल्या. मागील सुमारे 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. मात्र 2005 मध्ये काही कारणामुळे सेनेचे ज्येष्ठ नेते तथा बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतःचा पक्ष काढला. बाळासाहेब असतानाच राज ठाकरे यांनी पक्ष काढला. त्यामुळे नाराज झालेल्या बाळासाहेबांनी माझा फोटो वापरू नका असे आदेश दिले होते.

यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात दुरावा वाढत गेला. दरम्यान, सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात विविध आश्चर्यकारक घडामोडी होताना पाहायला मिळत आहे. गतवर्षी शिवसेनेत उभी फूट पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 आमदारांना घेऊन बंड पुकारले होते. त्यानंतर चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह थेट युती सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यामुळे अवघ्या महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

अगोदर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पडलेली फूट, ठाकरेंनी गमावलेले शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह, राज्यात आलेले शिंदे- फडणवीस सरकार हे अवघ्या राज्यातील जनतेसाठी आश्चर्याचे एकएक धक्केच होते. त्यामुळे मनसेना अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले तर, राज्यात पुन्हा राजकीय महाभूकंप होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे.

महाराष्ट्र निर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांची आक्रमक नेते म्हणून छबी आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमी नेतृत्व असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. त्यामुळे दोन्ही बंधू आगामी मुंबई महापालिकेसह लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्रित आले तर अवघ्या महाराष्ट्राचे राजकारणाचे चित्र पलटून जाईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

..तरीही संपर्कात

दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये दुरावा वाढत असला तरी, अधून मधून दोघांचा संवाद देखील होताना दिसून आला. जेव्हा उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी राज ठाकरे यांनी त्यांची गाडी चालवली होती तसेच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या लग्नाला देखील उद्धव ठाकरे व परिवाराने हजेरी लावली होती. महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर उद्धव ठाकरे 2019 ला राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला देखील राज ठाकरे यांच्या आई व परिवारासह हजर होते. असे अनेक कौटुंबिक प्रसंग घडले आहे.

राज ठाकरे तसेच उद्धव ठाकरे एकत्रित आल्यास त्याचा परिणाम राज्यातील राजकारणावर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरे यांना सत्ता गेल्यापासून मिळत असलेली सहानुभूती तसेच इतर काही पक्षात झालेल्या बंडखोरीमुळे दोन्ही भाऊ एकत्र आले तर शिवसेनेपासून दूर गेलेला मतदार व इतर पक्षांकडून नाराज झालेला मतदार हे या दोन्ही बंधूंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग मुंबईसह राज्यात आहे. सुमारे सहा टक्के पेक्षा जास्त मतदान मुंबई महापालिकेत राज ठाकरे यांच्याकडे असल्याचे बोलले जाते. त्यामुळे ही जोडी जर मैदानात उतरली तर अनेकांंना धक्का बसू शकतो.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्रित यावे, अशी भावना आहे. तसे फलकही मुंबईत लावण्यात आले आहेत. मात्र हा निर्णय दोन्ही बंधूंनी घ्यायचा आहे.

बाळा नांदगावकर, ज्येष्ठ नेते, मनसेना

- Advertisment -

ताज्या बातम्या