अनियमित कर्ज वाटप प्रकरणात तपास अधिकाऱ्यांची साक्ष?

अनियमित कर्ज वाटप प्रकरणात तपास अधिकाऱ्यांची साक्ष?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा बँक NDCC Bank अनियमित कर्ज Loan वाटपप्रकरणी कलम 83 अन्वये या प्रकरणाची चौकशी करणारे प्राधिकृत चौकशी अधिकारी investigating officers जयेश आहेर यांना साक्ष नोंदविण्यासाठी सोमवारी (दि.13) उपस्थित राहण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे.

अनियमित कर्जवाटपप्रकरणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालक व बँक सेवक अशा 44 जणांची कलम 88 अन्वये सुरू असलेली चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे. यामध्ये कलम 83 अन्वये या प्रकरणाची चौकशी करणारे प्राधिकृत चौकशी अधिकारी व संगमनेरचे तत्कालीन उपनिबंधक, सहकारी संस्था जयेश आहेर यांना साक्षीसाठी हजर राहण्याचे आदेश कलम 88 नुसार चौकशी करिता प्राधिकृत अधिकार्‍यांनी दिले असल्याचे समजते.

जिल्हा बँकेमध्ये जवळपास 300 कोटींपेक्षा अधिकचे कर्ज वितरणात मोठी अनियमितता झाली व ही कर्जाची रक्कम थकीत असल्याने बँकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. याप्रकरणी माजी संचालकांसह सेवक अशा 44 जणांवर नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी कलम 88 नुसार चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी आतापर्यंत अनेकदा 44 जणांना बोलविण्यात आले.

करोनाकाळात सुनावणी बंद असल्याने ही प्रक्रिया ठप्प होती. ती पुन्हा सुरू झाल्यानंतर आक्षेप व त्यावर म्हणणे मांडण्यास संबंधितांना सांगण्यात आले होते. दरम्यान, कलम 83 अन्वये या प्रकरणाची चौकशी करून संबंधित संचालक व सेवक दोषी असल्याचे चौकशीत समोर आले होते. यानंतर आता कलम 88 नुसार सुरू असलेल्या चौकशीच्या अंतिम टप्प्यातील भाग म्हणूनच जयेश आहेर यांना साक्ष नोंदविण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या चौकशीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com