Corona
Corona
मुख्य बातम्या

कोव्हिड रुग्णांच्या मनोरंजनासाठी टीव्ही, मोबाईलची व्यवस्था

जिल्हाधिकारी मांढरे : जिल्हा रुग्णालयात सुविधा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । दि.३ प्रतिनिधी

करोना पाॅझिटिव्ह रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधता यावा व मानसिक तणाव हलका व्हावा यासाठी जिल्हा रुग्णालयात मोबाईल व मनोरंजनासाठी टिव्हीची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. रुग्णालयाच्या प्रत्येक मजल्यावर दोन स्मार्ट फोन व एक टिव्ही लावला जाईल.

जेणेकरुन करोना रुग्ण व्हिडिअो काॅलद्वारे नातेवाईकांशी संवाद साधू शकतो. नातेवाईकही रुग्णाची विचारपूस करु शकतात. तसेच टिव्हिद्वारे रुग्णांना समुपदेशन केले जाणार असून मनोरंजनाची देखील व्यवस्था केली जाणार आहे.

जिल्हा रुग्णालयाचे कोव्हिड रुग्णालयात रुपांतर करण्यात आले असून ७० टक्क्याहून अधिक रुग्ण या ठिकाणि उपचार घेत आहे. करोना पाॅझिटिव्ह रुग्ण हा प्रचंड मानसिक तणावात असतो. दिवसभर विविध उपचार, चाचण्या आदींमुळे तो मानसिकदृष्टया अशक्त बनतो. साधारण: पणे १४ दिवस त्यांन‍ा उपचाराला समोरे जावे लागते.

त्यांच्या नातेवाईकांना या ठिकाणी येण्यास व भेटण्यास मज्जाव असतो. नातेवाईकांना रुग्णाला भेटण्याची परवानगी दिली तर त्यांना देखील संक्रमणाचा धोका नाकारता येत नाही. अशा निराशाजनक वातावरणात उपचार घेत असलेले रुग्ण परिवारापासून एकटे पडल्याची भावना व्यक्त करतात.

ते बघता जिल्हा प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात प्रत्येक वॉर्डमध्ये रुग्णांसाठी मोबाईल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून या माध्यमातून रुग्ण आपल्या परिवाराशी व्हिडिओकॉल द्वारे बोलू शकणार आहेत .याशिवाय प्रत्येक करोना वॉर्डमध्ये टीव्ही संच बसविण्यात येणार असून या माध्यमातून रुग्णांना समुपदेशन आणि त्यासोबत त्यांचं मनोरंजन देखील केल जाणार आहे.

सकाळी १२ ते २ व सायंकाळी ६ ते ८ ही वेळ रुग्णांच्या नातेवाईकांना व्हिडिअो काॅलद्वारे संवाद साधण्यासाठी देण्यात आली आहे. तसेच रुग्णालयाचे तज्ज्ञ डाॅक्टर टिव्हिच्या माध्यमातून समुपदेशन करुन रुग्णांना तणावमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

जिल्हा रुग्णालयात करोना रुग्णांसाठी मोबाईल व टीव्ही संच उपलब्ध करुन दिले जाणार आहे. दिलेल्या वेळेत रुग्ण व्हिडिअो काॅलद्वारे त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधू शकेल. परिवारातील लोकांना देखील उपचाराची सगळी माहिती मिळेल. टिव्हीद्वारे रुग्णांचे समुपदेशन करुन त्यांना तणावमुक्त ठेवले जाईल.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी
Deshdoot
www.deshdoot.com