जुलै महिन्याचे शिक्षकांचे वेतन अद्यापही रखडले

जुलै महिन्याचे शिक्षकांचे वेतन अद्यापही रखडले

निफाड | प्रतिनिधी | Niphad

सप्टेंबर महिना सुरू झाला असतानाही अद्यापपर्यंत जुलै महिन्याचे प्राथमिक शिक्षकांचे (Teachers) वेतन (Salary) बँक खाती वर्ग झाले नसल्याने त्यांना नानाविध अडचणींचा सामना करावा लागत आहे…

त्यातच मागील महिन्यात जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेल्या पंचायतराज समितीने शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट टाकत तसा रहिवासी दाखला देण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिल्याचे समजते. साहजिकच या रहिवाशी दाखल्यामुळे (Resident certificates) शिक्षकांचे वेतन अडकल्याची चर्चा तालुक्यात दबक्या आवाजात सुरू आहे.

गाव विकासाचा प्रमुख कणा असलेले ग्रामसेवक, कामगार तलाठी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, शिक्षक, डॉक्टर, कोतवाल, पोलीस पाटील, वायरमन, विजअभियंता, पशुवैद्यकीय, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर अशा गावपातळीवर काम करणार्‍या सेवकांना शासनाने गेल्या वर्षापूर्वी सेवेत कार्यरत असलेल्या ठिकाणी राहण्याचे निर्देश दिले आहेत.

मात्र अद्यापही यातील 90 टक्के सेवक हे शहरातून ये-जा करतात. त्यामुळे गाव विकासाला अडचणी येतात. अनेकवेळा रात्रीच्या वेळेत वीज गायब होते. एखादा नागरिक आजारी पडतो.

जनावरांना दुखापत होते अशा एक ना अनेक समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागत असल्याने या सेवकांनी मुख्यालयी रहावे अशी स्थानिक नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती.

साहजिकच जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेल्या पंचायतराज समिती पदाधिकारी व अधिकार्‍यांपुढे देखील नागरिकांनी हाच पाढा वाचल्याने त्यावर तत्काळ कार्यवाही करीत जे सेवक रहिवासी दाखला देतील त्यांचेच वेतन अदा करण्याच्या सूचना केल्याने वरील अनेक सेवकांचे जुलै पासूनचे वेतन रखडले असल्याचे बोलले जात आहे.

साहजिकच या सेवकांचे तब्बल दोन महिन्याचे वेतन थकल्याने या सेवकांचे कर्जाचे हफ्ते, विमा हफ्ते यासह कुटुंबाच्या घर खर्चाचे नियोजन कोलमडून पडले आहे. तर निवासी राहत नसल्यामुळे या सेवकांना ग्रामपंचायत रहिवासी दाखला देवू शकत नसल्याने वेतन अदा करण्यासाठी हा मोठा अडथळा ठरत असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत शासनाच्या सेवेत असलेल्या सेवकांशी संवाद साधला असता त्यांचे मते आम्ही ज्या गावात कार्यरत आहोत त्या गावात पुरेशी सर्व सुखसुविधा असलेली घरे नाहीत. तसेच मुलांसाठी पुरेशा शिक्षणाच्या सुविधा नाहीत.

शाळा, दवाखाने, बाजारपेठ अद्ययावत नाहीत. तसेच ये-जा करण्यासाठी पुरेशी प्रवासी साधने नाहीत. त्यामुळे आम्हाला शहरात ये-जा करावी लागत असल्याचे या सेवकांचे म्हणणे आहे. तर याबाबत ग्रामस्थांशी संवाद साधला असता त्यांचे मते या सेवकांनी शहराप्रमाणे घरभाडे दिले तर आम्ही तशी घरे बांधून भाड्याने देण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया दिली.

साहजिकच रहिवासी दाखला मिळत नसल्याने या सेवकांना घरभाडे भत्त्याला मुकावे लागणार आहे. अन्यथा गावपातळीवर काम करणार्‍या सेवकांना निवासी रहावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com