Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशिक्षक भारतीचा तांबेंना बिनशर्त पाठिंबा

शिक्षक भारतीचा तांबेंना बिनशर्त पाठिंबा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

डॉ.सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe )यांनी कोणाची फसवणूक केली नाही. पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला. काँग्रेसने स्वार्थासाठी ही जागा गमावली. शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांच्या प्रश्नावर डॉ. तांबे यांची भूमिका स्वच्छ आहे. सत्यजित यांना उमेदवारी द्यावी, ही माझी मागणी होती. तेदेखील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यास कटिबध्द राहतील, अशी ग्वाही देत शिक्षक भारतीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyjit Tambe )यांना बिनशर्त पाठिंबा घोषित केला.

- Advertisement -

कालिका मंदिर सभागृहात शिक्षक भारती संघटनेचा मेळावा झाला. त्यावेळी आमदार पाटील यांनी ही घोषणा केली. व्यासपीठावर माजी आ.डॉ. सुधीर तांबे, अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे, शिक्षक भारती संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे, कोकाटे आदी उपस्थित होते.

अनेक नेत्यांनी पाठिंब्यासाठी फोन केला, पण त्यांची नावे सांगणार नाही. डॉ.तांबे यांच्यासोबत सभागृहात काम केले. ते कॉग्रेसचे असले तरी त्यांच्या घराचा वारसा लाल बावट्याचा आहे. जुनी पेंशन योजना, अनुदान, आदिवासी विद्यार्थी यांसह प्रत्येक घटकासाठी त्यांनी आवाज उठवला. त्याच पध्दतीने सत्यजितचे काम आहे. त्याच्यासाठी मतदारसंघाचा शोध घ्या, हे मी डॉ.तांबे यांना सुचवले. नाशिक पदवीधर मतदारसंघ त्यांच्यासाठी योग्य असल्याचे सांगून सत्यजित शिक्षकांचा प्रश्नांना न्याय देईल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

सत्यजितला सहकार्य करा : डॉ. तांबे

शिक्षक भारती संघटनेने मला तिन्ही निवडणुकीत सहकार्य केले. पेंशन, शिक्षकांचे न्यायिक अधिकार, भरती, अशैक्षणिक कामांचा मोबदला यासाठी सभागृहात आवाज उठवला. यंदा सत्यजित ही निवडणूक लढवत आहे. त्याला सहकार्य करा, असे आवाहन करीत मी माजी आमदार झालो तरी आमच्या परिवारातील आजी-माजी दोन्ही आमदार प्रश्न सोडवण्यासाठी कटिबध्द राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पाटील मदतीला : सत्यजित तांबे

शिक्षक भारतीने पाठिंबा दिल्याने त्यांचे आभार व्यक्त करून संकटात परिवाराला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जात असताना आ.कपिल पाटील धावून आले, अशा शब्दात सत्यजित तांबे यांनी भावना व्यक्त केल्या. कॉग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष, जि.प.सदस्य म्हणून काम केले असून हा अनुभव पाठिशी आहे. मी आंदोलनातून तयार झालो आहे. माझ्या वडिलांना तुम्ही साथ दिली. मी पण तशीच साथ तुम्हाला देईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या