सत्यजित तांबे यांना टीडीएफचे पाठबळ

सत्यजित तांबे यांना टीडीएफचे पाठबळ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पदवीधर, बेरोजगार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, डॉक्टर, वकील यांसह विविध आस्थापनांष काम करणारे शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करणारे मा.आ. डॉ. सुधीर तांबे यांच्याच कार्यकर्तृत्वाचा वारसा जपणारे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे ( Satyajit Tambe )यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी ( Nashik Graduate Constituency Election)राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडीने (National Teachers Democratic Alliance) अधिकृत जाहीर पाठिंबा दिला आहे.

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यातील महाराष्ट्र हायस्कूल येथे राज्य अध्यक्ष विजय बहाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, कार्यावाह हिरालाल पगडाल, पुणे विभाग कार्याध्यक्ष जी. के. थोरात, कोकण विभागाचे नरसू पाटील, मुंबईचे नानासाहेब पुंडे, पुणे विभागाचे सचिव के.एस. ढोमसे, धुळे जिल्हाध्यक्ष संजय पवार, सहसचिव डॉ. एन डी नांद्रे, खजिनदार संदीप घोरपडे, जळगावचे आर्. एच. बाविस्कर, अहमदनगरचे आबासाहेब कोकाटे, नाशिकचे रवींद्र मोरे, अशोक नवल, राजेंद्र लांडे, भाऊसाहेब कचरे, सुधीर काळे (नगर), नरेंद्र पाटील (नंदुरबार), कुशारे (नाशिक), दत्ता आरोटे, दशरथ मांडे, सुरेश झावरे, अरविंद कडलग, जिजाबा हासे (संगमनेर) आदींसह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना टीडीएफकडून उमेदवारीसाठी पुरस्कृत करण्यात आले.

अध्यक्ष विजय बहाळकर म्हणाले की, टीडीएफ संघटनेच्या पाठिंबावर मागील तीन वेळा आमदार डॉ. तांबे यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे. सर्व पदवीधर व शिक्षक आणि कर्मचार्‍यांचा विश्वास सार्थ ठरवताना त्यांनी मागील बारा वर्षात शिक्षकांचे व शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न प्राधान्याने सोडवले आहेत. याचबरोबर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदवीधर मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. शिक्षक आणि पदवीधर यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. याचबरोबर अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील सर्व टीडीएफ पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे.

माजी आमदार डॉ.सुधीर तांबे व त्यांचा परिवार पुरोगामी विचार जपणारा असून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांना टीडीएफ पूर्ण पाठिंबा असल्याचेही बहाळकर म्हणाले.

लोकशाही, समाजवाद, विज्ञान निष्ठा, धर्मनिरपेक्षता जपण्यासाठी पीडीएफने सातत्याने काम केले आहे. सत्यजित तांबे याच विचारांनी राज्यभर काम करीत आहेत. म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राज्यातील टीडीएफ एकमताने त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे, असे हिरालाल पगडाल यांनी सांगितले.

यावेळी टीडीएफचे कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, संजय पवार, नानासाहेब पुंडे, आर एच बाविस्कर डॉ. एन.डी. नांद्रे आदींनी मनोगत व्यक्त केले. तांबे यांना टीडीएफने दिलेल्या पाठिंब्याचे धुळे, जळगाव,नंदुरबार, नाशिक, अहमदनगरमधील विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी स्वागत केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com