तांबे यांना शिक्षक संघटनांसह राजकीय पक्षांचा पाठिंबा

तांबे यांना शिक्षक संघटनांसह राजकीय पक्षांचा पाठिंबा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक पदवीधर मतदारसंघातून ( Nashik Graduate Constituency Election)विधानपरिषदेच्या निवडणुकीत उतरलेल्या सत्यजीत तांबे (Satyajit Tambe )यांना पाठिंबा देण्यासाठी विविध शिक्षक संघटना आणि राजकीय पक्ष पुढे सरसावले आहेत. डॉ.सुधीर तांबे यांनी शिक्षक, पदवीधर, सामान्य नागरिक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला होता. अडीअडचणीच्या वेळी डॉ. तांबे यांनी केलेली मदत लोक आजही विसरलेले नाहीत.

यामुळे या सगळ्यांनी आता डॉ. तांबे यांच्याप्रमाणेच सत्यजीत तांबे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. सत्यजीत तांबे यांची स्वत:ची कार्यकर्त्यांची एक मोठी फळी आहे, त्याच्या जोडीला त्यांना त्यांच्या वडिलांच्या पाठिशी उभ्या असलेल्या असंख्य कार्यकर्ते आणि पाठिराख्यांची मदत होणार आहे.

महाराष्ट्र क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, चाँद सुलताना अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, रिपाइं (गवई गट), स्वाभिमानी शिक्षक संघटना (अहमदनगर जिल्हा), सैनिक कल्याण समिती, संगमनेर, अ‍ॅग्रीकल्चरल मायक्रो ऑर्गनिझम मॅन्युफॅक्चरर्स अँड फार्मर्स असोसिएशन या संघटनांनी तांबे यांना पाठिंबा दिला आहे.

सत्यजीत तांबे हेच या निवडणुकीत विजयी होणार हा विश्वास असलेल्या चाँद सुलताना अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने तांबे यांना पाठिंबा देण्यासाठी पत्र लिहिलेले आहे. या शिक्षण संकुलासाठी निधीची गरज असून निधी मिळत नसल्याने हे काम रखडले आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी गरजेचा असलेला निधी मिळण्यासाठी आपण व्यक्तिश: लक्ष घालावे. आमची मागणी ही तुमच्याच हातून पूर्ण व्हावी, असेही या पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्र क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने तांबे यांना पाठिंबा देताना म्हटले आहे की, डॉ. तांबे यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेले कार्य आणि सहकार्य याची महासंघाला जाणीव आहे. आम्ही सत्यजीत तांबे यांना सक्रीय पाठिंबा देत आहोत. राज्यातील शालेयस्तरावर क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांवर होणारा अन्याय तांबे यांच्या सहकार्याने दूर होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

स्वाभिमानी शिक्षक संघटनेने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देताना शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली आहे. उच्चशिक्षित, सहृदयी, पित्याचा वारसा आपल्याकडे आहे. या पदासाठी आपण योग्य उमेदवार आहात, असे सैनिक कल्याण समिती, संगमनेर यांनी तांबे यांना पाठिंबा देताना म्हटले आहे. कृषी पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी तरुण आणि धडाडीचे नेतृत्व लाभणार असल्याने आमच्या संघटनेचे सगळे पदवीधर आपल्या पाठिशी भक्कमपणे उभे आहेत, असे अ‍ॅग्रीकल्चरल मायक्रो ऑर्गनिझम मॅन्युफॅक्चरर्स अँड फार्मर्स असोसिएशनने म्हटले आहे.

रिपाइंने (गवई गट) तांबे यांना पाठिंबा देताना अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या 5 जिल्ह्यांसह 54 तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकार्‍यांना प्रचार यंत्रणेत सामील करून घेण्याची विनंती केली आहे.

यापूर्वी महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने सत्यजीत तांबे यांना या निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगावमधील सगळ्या पदवीधर मतदारांनी तांबे यांच्या नावासमोर 1 क्रमांक लिहून त्यांना निवडणुकीत प्रचंड बहुमताने जिंकवावे, असे आवाहन या संघटनांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने तांबे यांना पाठिंब्याचे पत्र लिहिले आहे. पदवीधरांना तांबे यांच्यात समस्यांचे निराकरण करणारा आशेचा किरण दिसत आहे. त्यांच्या विजयात आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने महाराष्ट्र खासगी शिक्षक संघटनेचा अध्यक्ष म्हणून तांबे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहे. नाशिक विभागातील संघटनेचे पदाधिकारी आणि हितचिंतक शिक्षक तांबे यांच्या विजयासाठी निष्ठेने काम करतील, असे आश्वासनही मनिष गावंडे यांनी दिले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com