Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याकुपोषणाचा कलंक पुसण्याचा उचलला विडा

कुपोषणाचा कलंक पुसण्याचा उचलला विडा

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

सातत्याने प्रयत्न करूनही बालकांंच्या कुपोषणाचा प्रश्न कायम आहे. आजही 5,800 बालके तीव्र कमी वजनाची असून 195 बालके तीव्र कुपोषित आढळून आली आहेत. हा कुपोषणाचा कलंक पुसण्यासाठीच 251 कर्मचार्‍यांंनी मुंबई आयआयटीच्या तज्ज्ञांकडून खास प्रशिक्षण घेऊन ही समस्या कायमची दूर करण्याचा विडा जिल्हा परिषदेने उचलला आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत निवडलेल्या तालुका वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, आशा वर्कर आदींना मुंबई आयआयटी यांचेकडील कुपोषण व स्तनपानविषयक उपक्रमाकरता प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले. निवड झालेल्या 251 सेवकांसह जिल्हा रुग्णालयाचे 50, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका, सेवक यांनाही प्रशिक्षण दिले गेले.

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महिला व बाल विकास अधिकारी दीपक चाटे यांच्या संकल्पनेतून बालकांचे कुपोषण व स्तनपान विषयक महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला.त्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांचेकडील जिल्हाभरातील 2 हजार 528 अधिकारी व कर्मचारी,आशा सेविका, सेवक, पर्यंवेक्षिका, एनआरएचएम, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची परिक्षाही घेण्यात आली होती.2402 उमेदवारांपैकी 2 हजार 362 जणांनी ही परिक्षा दिली. यासाठी या उमेदवारांना व्हिडीओच्या माध्यमातून अभ्यासक्रम देण्यात आला होता. यातून ही परिक्षा घेतली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

सदर प्री-टेस्ट परिक्षा ही गटविकास अधिकारी यांच्या नियंत्रणात व तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या देखरेखीखाली विविध केंद्रावर झाली होती. प्रशिक्षणार्थींना मुंबई आयआयटी यांचेकडील कुपोषण व स्तनपानविषयक उपक्रमाकरिता प्रशिक्षण दिले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, आयआयटीच्या डॉ. रूपल दलाल यानी दररोज 50 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिलेे.आता हे पूर्ण प्रशिक्षीत जिल्हाभरात जाऊन, आशा सेविका, पर्यवेक्षिका, तालुका वैद्यकीय अधिकारी आदींना प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी तालुकास्तरावरील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देऊन जिल्हा कुपोषण मुक्तीस हातभार लावणार आहेत.

बालकांचे सर्वेणक्ष

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण व आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे वजन घेऊन कुपोषणाचे सर्वेक्षण केले जाते. गेल्या जानेवारी 2023अखेरपर्यंत 0 ते 5 वर्षे वयोगटातील 3 लाख 37 हजार 457 मुलांपैकी 3 लाख 24 हजार 448 मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी 23 हजार 175 बालकांचे वजन कमी असल्याचे आढळून आले. तर, 5 हजार 843 बालके अत्यंत कमी वजनाची आढळून आली. त्यापैकी 1हजार 682 बालके मध्यम तीव्र कुपोषित, तर 192 बालके तीव्र कुपोषित आढळून आली आहेत.

प्रतिबंधक उपाय

* बाळाला एक ते दिड वर्षे स्तनपान करणे.

* बाळाला पहिल्या दिवसापासून वेळेवर दूध पाजणे.

* सहा महिन्यांनंतर लगेचच स्तनपानाबरोबरच वरच्या आहाराला सुरुवात करावी.

* दोन मुलांमधील अंतर कमीत कमी तीन वर्ष असावे.

* मुलाचे सर्व लसीकरण वेळेवर करावे.

* अंगणवाडीचा पोषक आहार मुलांना वेळेवर व नियमित द्यावा.

एक हजार दिवस महत्त्वाचे

गर्भधारणेपासून पुढील एक हजार दिवस माता, बालकासाठी महत्त्वाचे असतात. या कालावधीत मातेचे दूध बालकांसाठी आवश्यक असते. मात्र बालकास दूध मिळत नाही. यासाठी मातेकडून बालकास नियमित दूध तसेच पोषण आहार मिळावा यादृष्टीने हे प्रशिक्षण दिले. बालक जन्मापासून त्याची काळजी घेतल्यास कुपोषण होणार नाही हा त्यामागचा हेतू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या