जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढतोय; स्वयंस्फूर्तीने काळजी घ्या

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे आवाहन
जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढतोय; स्वयंस्फूर्तीने काळजी घ्या

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढतोय; स्वयंस्फूर्तीने काळजी घेतली तरच लॉकडाऊन टळेल, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. त्यांनी विशेष संदेश जनतेसाठी पाठवले असून सोशल मिडियावर तो चांगलाच व्हायरल झाला.

नाशिक जिल्ह्यामध्ये करोनाचा उपचार घेत असलेल्या रुग्णांचा सर्वाधिक आकडा साधारण सप्टेंबर मध्ये अकरा हजारांच्या जवळपास होता. तो 1 हजारपर्यंत पर्यंत खाली आला असताना गेल्या केवळ दोन ते तीन दिवसांमध्ये त्यामध्ये दोनशे ते तीनशेने वाढ झाली. आज आकडा 1544 वर पोहोचलेला आहे.

वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतःहून जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. करोना रुग्णांची वाढ होत राहिली तर मागील वर्षाची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही. 28 मार्च 2020 रोजी आपल्याकडे फक्त 1 करोनोचा रुग्ण होता आणि त्यावेळी संपूर्ण लॉकडाऊन होते पण आज आपल्याकडे पंधराशे रुग्ण आहेत. अशावेळेला आपण पंधराशे पट काळजी घ्यायला हवी.

मास्क लावा आणि लॉकडाऊन टाळा

गेल्या वर्षभरापासून आपण सर्व करोनाशी लढा देत आहोत. गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये आपल्याला थोडी आशा निर्माण झाली होती की आपण या संकटातून लवकरच बाहेर पडू. परंतु परिस्थिती पुन्हा बदलत आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये संसर्गामध्ये खूप लक्षणीय वाढ होताना दिसून येते आहे. त्यामुळे लॉकडाऊन सारखी परिस्थिती टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर हा सुरक्षा कवच म्हणून केला पाहिजे. तसेच याबरोबर सुरक्षित अंतर व सॅनिटायर्झचा वापर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com