स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग

jalgaon-digital
7 Min Read

१२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे जन्म झालेले नरेंद्रनाथ दत्त पुढे स्वामी विवेकानंद या नावाने ओळखले गेले. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षीच १८९३ मध्ये शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी आपले विचार मांडले होते. त्यानंतर जगाचे लक्ष त्यांनी वेधले. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो.

मनाची एकाग्रता लहानपणापासूनच

स्वामी विवेकानंद लहानपणापासूनच देवभक्त होते. एखादी गोष्ट करायला घेतल्यावर आपले संपूर्ण लक्ष त्या गोष्टीकडे लागणे आणि इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नसणे, अशा प्रकारची मनाची एकाग्रता होती. नरेंद्र आणि त्यांचे मित्र ध्यान लावून बसणे, यासारखे खेळ खेळत असत. एकदा नरेंद्र आणि त्याचे मित्र घरामध्ये देवाचे ध्यान लावून बसले होते. शांतपणे हालचाल न करता सर्व मुले बसली होती. नरेंद्र तर पूर्णपणे ध्यानमग्न झाले होते. तेवढ्यात एका कडेने सळसळ ऐकू आली. नरेंद्र यांच्या मित्रांनी डोळे झटकन उघडून बघितले तर त्यांना तेथे साप दिसला. त्यामुळे घाबरून, ओरडून सर्व जण खोलीबाहेर पळू लागले. काय झाले; म्हणून भुवनेश्वरीदेवी येऊन पाहातात तर काय ? नरेंद्र तसाच शांतपणे डोळे मिटून बसला होता. साप त्याच्या जवळून दुसरीकडे गेला, तरी नरेंद्रला त्याचा पत्ताच नव्हता.

एकाग्रतेचे महत्व

एकदा अमेरिकेतील एका समुद्रकिनाऱ्यावर काही मंडळी एक खेळ खेळत होती. तो खेळ असा होता की, समोर येणाऱ्या लाटेवरील हिंदकळणाऱ्या चेंडूवर नेम धरून मारणे. चेंडू सततच हालत असल्यामुळे तेथील कुणालाच ते व्यवस्थित जमत नव्हते. एक भारतीय युवक तेथून चालला होता. त्याने त्या हिंदकळणाऱ्या चेंडूवर आपला नेम अचूक मारून दाखवला. तो युवक अर्थात् नरेंद्र दत्त म्हणजेच स्वामी विवेकानंद होता. अमेरिकन मंडळींनी ते पाहून आश्चर्य व्यक्त केले. `हे त्यांना कसे जमले’, या अमेरिकन मुलांच्या प्रश्नाला उत्तर देतांना विवेकानंद यांनी त्यांना एकाग्रतेचे महत्त्व पटवून दिले. केवळ एकाग्रतेनेच हे साध्य होऊ शकते, असे ते म्हणाले.

राजाला दिली अशी शिकवण

स्वामी विवेकानंद भ्रमंती करत असेच एकदा उत्तरेकडील अलवार संस्थानात गेले. त्यांचे प्रवचन ऐकायला गेलेल्या त्या संस्थानच्या दिवाणाने प्रभावित होऊन त्यांना राजवाड्यावर नेले आणि त्यांची राजा मंगलसिंह यांची भेट घडवून आणली. राजाचे आयुष्य चैनीत चालले होते. शिवाय त्याच्या मनात राजेपणाचा अहंकारही होता. विवेकानंदाना पाहून त्याला वाटले, बोलून चालून हा एक तरुण संन्याशी ! इंग्रजीत प्रवचन करत असला, तरी याचा अनुभव तो किती असणार ? आपण याची फिरकी घ्यावी, असा विचार करून तो म्हणाला, ‘स्वामीजी, मूर्तीपूजा म्हणजे शुद्ध अडाणीपणा आहे, असे मी मानतो. एखाद्या मूर्तीला हळदकुंकू आणि फुले वाहतांना तसेच तिच्यापुढे हात जोडतांना लोकांना पाहिले की, मला त्यांची कीव येते. याबाबतीत तुमचे काय मत आहे ?’ राजाच्या या प्रश्नाला सरळ उत्तर न देता स्वामी दिवाणजींना म्हणाले, ‘दिवाणजी, या भिंतीवर टांगलेल्या चित्रावर थुंकून येता का ?’ स्वामींच्या तोंडचे हे वाक्य ऐकून दिवाणजींना कापरेच भरले.

रागाने लालबुंद झालेल्या राजाच्या चेहऱ्याकडे एकवार चोरट्या नजरेने बघून दिवाणजी म्हणाले, ‘ स्वामी काय बोलता हे ? ते महाराजांचे दिवंगत वडील आहेत !’ विवेकानंद म्हणाले, ‘दिवाणजी, तो तर काळ्या शाईने रंगवलेला एक जाड कागद आहे’. एवढे बोलून ते राजाला उद्देशून म्हणाले, ‘राजेसाहेब, त्या चित्रात अस्थी, मांस आणि जीव असलेले आपले वडील नाहीत; म्हणून त्याला केवळ काळ्या रंगाने रंगवलेला जाड कागद असे म्हणणे जेवढे अविचाराचे आहे, तेवढेच मूर्तीत प्रत्यक्ष देव नसतांना तिला देव मानून तिची पूजा करणाऱ्यांची कीव करणे अविचाराचे आहे.’ स्वामी पुढे म्हणाले, ‘मूर्ती म्हणजे देव नव्हे, हे त्या मूर्तीची पूजा करणारे ज्ञानी भक्त जाणतात; परंतु निर्गुण, निराकार परमेश्वराची ध्यानधारणा करणे, ही सर्वसामान्यांना जमणारी गोष्ट नसल्याने, त्यांना ईश्वरभक्ती करता यावी, यासाठी मूर्तीपूजा ही प्रारंभीची पायरी आहे. यातूनच पुढे तो परमेश्वराशी एकरूप होण्याचे ध्येय साध्य करू शकतो’. हे ऐकून राजा अंतर्मुख होऊन विचारात पडला.

स्वामीजी आणि अंधश्रद्धा

एका महिला स्वामी विवेकानंद यांना म्हणाली, ‘स्वामीजी काही दिवसांपासून माझा एक डोळा सारखा फडफडत आहे, काहीतरी अशुभ घडणार असे मला वाटते. कृपया एखादा उपाय सांगावा ज्यामुळे हा अपशकुन टळेल.’

स्वामीजी म्हणाले, ‘देवी माझ्या दृष्टीने काहीच शुभ आणि अशुभ नाही. जीवनात चांगल्या आणि वाईट दोन्ही घटना घडत असतात. लोक आपल्या विचारानुसार त्या घटनांना शुभ-अशुभ मानतात. जी गोष्ट आज शुभ आहे तीच उद्या अशुभ होऊ शकते. जी गोष्ट एखाद्यासाठी शुभ असते तीच दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी अशुभ असते. हे सर्वकाही परिस्थितीवर निर्भर करते.

महिलेने पुन्हा विचारले, असे कसे होऊ शकते की एक गोष्ट एकासाठी शुभ आणि दुसऱ्यासाठी अशुभ.’

स्वामीजींनी उत्तर दिले, ‘एक कुंभार मडके तयार करून वाळवण्यासाठी ठेवतो आणि कडक उन्हाची इच्छा व्यक्त करतो. त्याचवेळी दुसरीकडे एखादा शेतकरी पाऊस पडावा अशी इच्छा व्यक्त करतो, ज्यामुळे त्याची शेती चांगली व्हावी.या स्थितीमध्ये ऊन आणि पाऊस एकासाठी शुभ आणि दुसऱ्यासाठी अशुभ आहे. यामुळे आपण शुभ-अशुभ याचा विचार करू नये. याउलट नेहमी चांगले काम करत राहावे.’

विवेकानंद यांनी सांगितले आईचे महत्व

स्वामी विवेकानंद यांना एका व्यक्तीने विचारले, जगात आईची महिमाच का गायीली जाते. स्वामीजी हसले आणि म्हणाले, ‘पाच शेर वजनाचा एक दगड घेऊन या.’ ती व्यक्ती दगड घेऊन आल्यावर स्वामीजी म्हणाले, आता हा दगड कापडात गुंडाळून आपला पोटावर २४ तास बांधून ठेव. त्यानंतर तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. ती व्यक्तीने दगड बांधून घेतला आणि दिवसभर काम करत राहिला. परंतु नेहमी त्याला थकवा वाटत होता. संध्याकाळी दगडाचे वजन घेऊन चालनेही अवघड झाले होते. तो स्वामीजींकडे आला आणि म्हणाला, आता जास्त वेळ हा दगड ठेवता येणार नाही.

स्वामीजी हसले म्हणाले, तुम्ही काही तास पोटावर दगड बांधू शकले नाही. परंतु आई आपल्या गर्भात नऊ महिने हे वजन सांभाळत आणि आपले काम करत राहते.जगात आईशिवाय इतके धैर्य कोणीच दाखवू शकत नाही. यामुळे आईपेक्षा मोठा जगात कोणीच नाही.

त्या महिलेस मानले आई

एक विदेशी महिला स्वामी विवेकानंद यांच्याकडे येऊन म्हणाली, मला तुमच्याशी लग्न करायचे आहे. त्यावर स्वामीजी म्हणाले, ’मी तर सन्याशी आहे.’ परत ती महिला म्हणाली, ’मला तुमचासारखा गौरवशाली, सुशील व तेजोमयी पुत्र हवा आहे. हे तुमच्याशी लग्न केल्यानंतरच शक्य आहे.

विवेकानंद म्हणाले, ’एक उपाय आहे. आजपासून तुम्ही माझ्या आई व्हा. मी तुमचा पुत्र होतो. तुम्हाला माझ्या रुपाने माझ्यासारखा मुलगा मिळेल.’ त्यानंतर ती महिला स्वामीजींच्या चरणावर पडली आणि म्हणाली, तुम्ही साक्षात ईश्वराचे रुप आहात.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *