Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याअंबड गावातील खून प्रकरणी संशयितांना अवघ्या बारा तासांत अटक

अंबड गावातील खून प्रकरणी संशयितांना अवघ्या बारा तासांत अटक

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

अंबड गावातील मयूर दातीर या वीस वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करून फरार झालेल्या तिघा संशयितांसह त्यांना मदत करणाऱ्या एकास पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील एका पाड्यावरून अंबड पोलीस व गुन्हे शाखेच्या घटनेनंतर अवघ्या १२ तासांत अटक केली.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गुरुवारी दुपारी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मयूर केशव दातीर (२०,रा. फडोळ मळा,अंबड,नाशिक ) याला संशयित करण अण्णा कडूसकर (२१, रा- अंबडगाव नाशिक), मुकेश अनिल मगर (२५,रा. अशोकनगर सातपुर नाशिक), रविंद्र शांताराम आहेर (२८,रा. येवला नाशिक) या तिघांनी धारदार शस्त्राने वार करून ठार मारले होते. घटना घडल्यानंतर तिघे संशयित फरार झाले होते.

भर दिवसा झालेल्या या हत्येच्या प्रकाराने अंबड गाव व परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अंबड ग्रामस्थांमध्ये याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्याने त्यांनी अंबड गाव ते अंबड पोलीस ठाणे पायी मूक मोर्चा काढून अंबड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. व संशयितांना अटक होई पर्यंत ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला होता मात्र पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर सदरहू आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यान संशयितांना तात्काळ अटक करण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव,उपायुक्त परिमंडळ २ मोनिका राऊत,सहाय्यक आयुक्त सिताराम कोल्हे,सहाय्यक आयुक्त आनंदा वाघ,सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख,बड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांनी अंबड पोलीस ठाणे गुन्हेशाखा युनिट क १ युनिट क २ ची पथके तयार करून आरोपीचा शोध घेणेकामी त्रंबकेश्वर, ईगतपुरी, घोटी, वाडीव-हे, कोपरगाव, येवला येथे पथके रवाना केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अंबड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदिप पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तसेच गुन्हेशाखा युनिट १ चे राहुल पालखेडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे संशयित हे मोखाडा जि.पालघर येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी गुन्हे शाखा युनिट १ व अंबड पोलीस ठाणेचे २ पथके यांनी मोखाडा येथे जाऊन तिघा संशयितांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या.तर त्यांना मोखाडा येथे लपविण्यास मदत करणारा राकेश कैलास शेलार, (रा.खंबाळेगाव, त्रंबकरोड, नाशिक ) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, गुन्हेशाखा युनिट क १,अंबड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ,पोलीस निरीक्षक (गुन्हे) अशोक नजन, तसेच गुन्हेशाखा युनिट क १चे स.पो.नि. हेमंत तोड़कर अंबड पोलीस ठाणे कडील उपनिरीक्षक संदिप पवार, उपनिरीक्षक नाईद शेख, गुन्हेशाखा युनिट क १ अंमलदार रविंद्र बागुल, नाजीम पठाण, प्रविण वाघमारे, विशाल काते, विशाल देवरे,मुक्तार शेख, राहुल पालखेडे अंबड पोलीस ठाणे कडील पवन परदेशी, समाधान चव्हाण, सविन करंजे , प्रविण राठोड, तुषार मते, राकेश राउत, संदिप भुरे, जनार्दन ढाकणे, राकेश पाटील,कुणाल राठोड यांनी संयुक्तरित्या केली आहे.संशयितांना पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना २५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अशोक नजन करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या