
मुंबई | Mumbai
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील (Ratnagiri) खेडमधील गोळीबार मैदानावर सभा घेत शिंदे गट आणि रामदास कदमांवर निशाणा साधला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री व शिवसेना (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या खेडमधील सभेत उद्धव ठाकरेंवर टीका केली...
काल झालेल्या सभेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते की, "मी गद्दार नसून खुद्दार आहे. त्यामुळे हे सरकार घेणारे नसून हा मुख्यमंत्री देणारा आहे, देत देत आला आहे", असे त्यांनी म्हटले. तसेच मी काम करणारा मुख्यमंत्री असून घरात बसून फक्त आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. असेही शिंदे म्हणाले होते. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Aandhare) यांनी मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
अंधारे यांची मुखेड येथे महाप्रबोधन यात्रा पार पडली. यावेळी त्या म्हणाल्या की, "त्यांचा हा उन्मत्तपणा, अहंकार हा सर्वश्रुत आहे. गर्वाचे घर खाली असते. लोक उत्तरं देतील. 'मी गद्दार नाही, खुद्दार आहे' असं त्यांनी म्हणणं हा जोक ऑफ द डिकेड आहे. गेल्या १० वर्षांतील हा अत्यंत सुंदर आणि चांगल्या दर्जाचा विनोद आहे", असं सुषमा अंधारे यांनी म्हटले.
तसेच पुढे त्या म्हणाल्या की, तु्म्ही लोकांना देणार असाल तर महिलांसाठी अर्ध तिकीट नाही, १२०० वरचा सिलेंडर ४०० वर आणा. जर तुम्ही देणारे असाल, तर कापसाच्या भावाचं काय झालं ते सांगा. हरभरा, गहू पिकाचं अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान यावर तुम्ही का बोलत नाहीत? जुन्या पेन्शनसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत का पोहोचत नाहीत? मला वाटतं एकनाथभाऊ डायलॉग खूप मारतात. पण त्यांचा स्क्रिप्टरायटर त्यांनी बदलायची गरज आहे, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना (CM) लगावला.