विनाकारण फिरणार्‍यांवर ड्रोनची नजर

निफाड पोलीस ठाण्याचा उपक्रम
विनाकारण फिरणार्‍यांवर ड्रोनची नजर

निफाड । प्रतिनिधी

निफाड शहरात करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हा संसर्ग कमी करण्यासाठी वाढत्या गर्दीवर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याने विनाकारण फिरणार्‍या नागरिकांवर वचक प्रस्थापित करण्यासाठी निफाड पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात ड्रोनचा वापर करत विनाकरण फिरणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा निफाडच्या शांतीनगर चौफुलीवर पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या हस्ते करण्यात आला.

नाशिकच्या अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या आदेशाने जिल्हा कार्यालयाकडून निफाडसाठी ड्रोन देण्यात आले. परिणामी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक रंगराव सानप, गोकुळ पवार, सुनील सूर्यवंशी यांच्या हस्ते आकाशात ड्रोन उडवून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

शहरात करोनाचे संक्रमण झपाट्याने होत असल्याने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. शहराच्या प्रत्येक चौकासह गल्लीबोळ, दवाखाने, हॉटेल व इतर आस्थापने अशा सर्वच ठिकाणी पोलीस सेवक पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून या परिसरावर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

साहजिकच शहरात ड्रोनचा वापर सुरू झाल्याने आता विनाकरण फिरणार्‍यांवर वचक प्रस्थापित होणार आहे. कालपासून निफाड पोलिसांनी वाहन तपासणीस प्रारंभ केल्याने आता विनाकारण वाहनातून फिरणार्‍यांना लगाम बसणार आहे. निफाड पोलीस ठाण्याला मिळालेली ही ड्रोन दिवसभर शांतीनगर चौफुली, गणेशनगर, शिवाजी चौक, शनिचौक, शांतीनगर, माणकेश्वर चौक, अकोलखास लेन, जनार्दन स्वामीनगर, अहिल्यादेवीनगर, सरस्वतीनगर, कुरणे रो-हाऊस, उपजिल्हा रुग्णालय परिसर, बरड वस्ती, आवळानगर, जोसवाडा अशा सर्वच परिसरावर नजर ठेवणार आहे.

शांतीनगर चौफुलीवर आयोजित उपक्रमाप्रसंगी निफाड पोलीस ठाण्याचे विलास बिडगर, दीपक पगार, मनोज आहेर, तुषार सोनवणे, ज्ञानेश्वर सानप, जयकुमार महाजन, सागर सारंगधर, भारत पवार, त्र्यंबक पारधी, संदीप निकम, विश्वनाथ निकम, संदेश भिसे आदींसह निफाड पोलीस ठाण्याचे सेवक उपस्थित होते. निफाडप्रमाणे उगाव, पिंपळस येथेही ड्रोनचा वापर केला जाणार आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडू नये

करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शहरावर आता ड्रोनची नजर असणार आहे. तसेच पोलीसदेखील विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई करतील. जिल्हा कार्यालयाकडून आताच निफाड पोलीस ठाण्याला ड्रोन प्राप्त झाल्याने पोलीस अप्पर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पोलिसांसह ड्रोनचीदेखील शहरावर नजर असणार आहे. हे ड्रोन साधारण 400 मीटर उंच व 600 ते 800 मीटर समोरच्या परिसरात फिरू शकते. यामुळे पोलिसांवरील ताण काही प्रमाणात कमी होईल. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये व शासनाच्या नियमांचे पालन करावे.

- रंगराव सानप, पोलीस निरीक्षक, निफाड

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com