निवडणूक आयोगाची बघ्याची भूमिका

ग्रा. पं. निवडणुकीवर अतिवृष्टीचे सावट
निवडणूक आयोगाची बघ्याची भूमिका

दिंडोरी । संदिप गुंजाळ Dindori

सध्या पावसाने ( Rain ) सर्वत्र कहर सुरू असतांना ग्रामपंचायत निवडणुक ( Grampanchayat Elections )प्रचाराचा धुराळा उडाला आहे. दोन दिवसात प्रचार संपवुन निवडणूक प्रक्रिया पार पडणार असली तरीही वाढत्या पावसामुळे मतदान टक्केवारीवर त्याचा परिणाम तर होणार नाही ना ? याची धास्ती उमेदवार आणि पॅनल प्रमुखांनी घेतला असून ग्रामपंचायत निवडणुकांवर अतिवृष्टीचे सावट पसरले असतांना निवडणूक आयोग फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दिंडोरी तालुक्यात एकुण 50 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत आहेत. रविवार 18 सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असुन 19 सप्टेंबर रोजी या मतदानाचा निकाल घोषित होणार आहे. दिंडोरी तालुक्यातील पावसाची वाढती सरासरी बघुन मागील टप्प्यात दिंडोरीच्या निवडणुकांना ब्रेक दिला होता. या टप्प्यात दिंडोरी तालुक्याचा नंबर लागला असला तरीही ऐन वाढत्या पावसात दिंडोरीच्या ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजले गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निवडणुका वाढत्या पावसामुळे थांबतील असा अंदाज लावला जात असतांना वाढत्या पावसात निवडणुक प्रक्रियांना वेग आला आहे.

गावोगावातील प्रशासकीय अधिकारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत असल्याने आपत्ती काळात प्रशासकीय अधिकारी गावात असतील का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येत्या दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याप्रमाणे पावसानेही जोर वाढवला आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळित झालेली बघावयास मिळत आहे. असे असतांनाही निवडणूक आयोग फक्त बघ्याची भूमिका घेत असुन निवडणूकीसंबंधी कोणताही निर्णय घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जर पावसामुळे मतदान टक्केवारीवर परिणाम झाला तर काय करायचे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

साधारण दीड वर्ष निवडणुकांना स्थगिती आलेली होती. ती स्थगिती ऐन वाढलेल्या पावसात उठल्यामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक वाढलेली दिसत नाही. अति पावसामुळे जर मतदार मतदान करण्यासाठी आलेच नाहीत तर दोष कुणाचा असणार असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

गावातील तलाठी वर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त करून टाकले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी या वर्गावर विशेष करून आहे. सध्या वाढत्या पावसामुळे नद्या नाल्यांना पुर येणे, वीज पडणे, अति पावसामुळे घरांच्या भिंती पडणे या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा वेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गावात असणे आवश्यक असताना निवडणूक आयोगाने हे अधिकारी कामाला लावले असल्याने संबंधित अधिकार्‍यांना गावात लक्ष देणे जमत नाही. त्यामुळे ऐनवेळी कोणतीही परिस्थिती उद्भवली जावू शकते. ती नाकारली जावू शकत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने तात्काळ दिलासादायक निर्णय घेत ईच्छुक उमेदवारांबरोबरोर जनतेची झालेल्या कोंडीवर तत्काळ निर्णय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com