Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याउपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून महाराष्ट्रातील 'या' नेत्याला संधी?

उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याला संधी?

नवी दिल्ली । New Delhi

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये (Presidential Election) भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना वाढता पाठिंबा पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळेच आता भाजपने आपला मोर्चा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीकडे (Vice President Election) वळवल्याचे दिसत आहे. त्यातच राजकारणात धक्कातंत्राचा अचूकपणे वापर करण्यासाठी प्रसिद्ध असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याकडून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एक नवा डाव खेळला जाण्याची शक्यता आहे…

- Advertisement -

आज सायंकाळी पाच वाजता दिल्लीमध्ये (Delhi) होणाऱ्या भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांच्या नावाचा समावेश आहे. देशाच्या १६ व्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ६ ऑगस्टला होणार आहे.

लोकसभा व राज्यसभेच्या एकूण ७८८ खासदारांमधून उपराष्ट्रपतींची निवड होते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक स्वबळावर जिंकण्याऐवढी भाजपकडे मते नसल्याने प्रादेशिक पक्षांची मदत घेण्यात येत आहे. पण उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने मित्र पक्षांवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळेच आजच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये भाजप उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित करणार असल्याचे बोलले जात आहे.

तसेच उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत सुरेश प्रभू यांच्यासह काही दिवसांपूर्वीच आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांचेही नाव आघाडीवर आहे. त्यासोबतच हरदीप पुरी, एस. एस. आहलुवालीया या तीन नावांचीही केंद्रीय संसदीय समितीच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तर या चार नावाप्रमाणेच आरिफ खान, नजमा हेपतुल्ला, कॅप्टन अरमिंदर सिंग, आनंदीबेन पटेल या नेत्यांची नावेही चर्चेत आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये सुरेश प्रभू यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासहीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष (BJP National President) जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर सुरेश प्रभू यांनी अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो ट्विट केला होता. त्यामुळे भाजपकडून सुरेश प्रभू यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाऊ शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रभू यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला असून त्यांनी निवडणुकींच्या राजकारणातूनही निवृत्ती घेतली आहे.

कोण आहेत सुरेश प्रभू?

सुरेश प्रभू यांनी १९९६ मध्ये तळकोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून (Rajapur Lok Sabha Constituency) शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांनी प्राध्यापक मधू दंडवते (Madhu Dandvate) यांचा पराभव केला. यानंतर १९९८, १९९९ या सालच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळविला. १९९८ साली अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते वने व पर्यावरण खात्याचे मंत्री बनले. खते व रसायन खात्याचा कारभारही त्यांनी सांभाळला. २००४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळविला होता.

त्यानंतर २००९ मध्ये तत्कालीन काँग्रेस नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सुरेश प्रभू यांना सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून पराभूत केले होते. तसेच २०१४ मध्ये शिवसेनेने (Shivsena) सुरेश प्रभू यांच्याऐवजी विनायक राऊत (Vinayak Raut) यांना सिंधुदुर्गातून लोकसभेची उमेदवारी दिली. त्यामुळे सुरेश प्रभू शिवसेनेतील संघटनात्मक राजकारणापासून बाजूला गेले होते. हीच संधी साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सुरेश प्रभू यांना राज्यसभेची उमेदवारी देत त्यांना भाजपमध्ये आणत सर्वांनाच धक्का दिला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरेश प्रभू यांच्यावर अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या