
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
भाजप म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा त्यामुळे भाजपने (BJP) माफीनामा, माफीनामा असे ओरडत ढोंगीपणा करून जनतेची दिशाभूल करणे अगोदर बंद करावे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी एक्सवरून (ट्वीट) केली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने (Congress-NCP Government) आपल्या कार्यकाळात कधीही कंत्राटी तत्वावर कार्यकारी पदे भरली नव्हती, असा खुलासाही त्यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी काल, शुक्रवारी प्रशासनात बाह्य स्त्रोतातून कंत्राटी भरती (Contract Recruitment) करण्याचा उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाचा शासन आदेश रद्द करत असल्याची घोषणा केली. सरकारचा हा निर्णय जाहीर करताना फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचे पाप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे असल्याचे सांगत याप्रकरणी शरद पवार, ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली. फडणवीस यांच्या या मागणीचा सुळे यांनी समाचार घेतला आहे.
कंत्राटी पद्धत कुणी सुरु केली याचा शोध भाजपने जरुर घ्यावा. मात्र, राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांनी संघटीतपणे केलेल्या विरोधापुढे हे सरकार झुकले आहे. आता आपले अपयश लपविण्यासाठी माफिनाम्याचे खूळ भाजपने काढले आहे. उपमुख्यमंत्री महोदयांना जुने संदर्भ काढून आपल्या चुकांचे खापर पुर्वसूरींवर फोडायची खोड आहे. उगाच वडाची साल पिंपळाला लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा ज्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालविता त्यांच्याशी दोन शब्द बोलून घेतले असते तरी आपण हे 'हवाबाण' सोडण्याची हिंमत केली नसती, अशी टीका सुळे यांनी केली आहे.
कंत्राटी भरतीचा निर्णय २०११ आणि २०२१ सालच्या मंत्रिमंडळाने केला म्हणायचे आणि दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळातील (Cabinet) मंत्र्यांसोबत सत्ता उपभोगायची. या स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजण्याच्या भाजप वृत्तीचे कार्ड महाराष्ट्राच्या जनतेपुढे मुळीच चालणार नाही, असे सुळे यांनी एक्समध्ये (ट्वीट) नमूद केले आहे.
तसेच भाजपच्या नेत्यांना संदर्भ आठवत नसतील तर या यादीतील नेत्यांना संपर्क साधावा, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी २०११ मधील आणि महाविकास आघाडीतील मंत्र्यांची यादी दिली आहे. या यादीतील मंत्री आता भाजपमध्ये आहेत तर काही भाजपसोबत सत्तेत आहे. २०११ सालातील मंत्र्यांमध्ये विजयकुमार गावीत, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, नारायण राणे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांचा तर महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, उदय सामंत, धनंजय मुंडे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, संजय बनसोडे, आदिती तटकरे यांचा समावेश आहे.