
नवी दिल्ली | New Delhi
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला असून याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central Election Commission) सुनावणी पार पडली...
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांच्या साथीने एक वेगळा गट तयार केला आणि भाजपच्या मदतीने राज्यात सत्तास्थापन केली. यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांकडून शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला आणि हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले. त्यानंतर ७ ऑक्टोबरच्या दरम्यान शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले. तेव्हापासून केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि पक्षचिन्ह यावर सुनावणी सुरू झाली.
त्यानंतर आज झालेल्या सुनावणीवेळी दोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद (Argument) केला. त्यानंतर निवडणूक आयोगाने सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली. त्यानुसार आता शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरील पुढील सुनावणी शुक्रवार (दि.२०) रोजी होणार आहे.
यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी युक्तिवाद करतांना म्हटले की, शिंदे गटाने (Shinde Group) दाखल केलेली कागदपत्र जुनी असून शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी केलेला दावा हा बोगस आहे.तसेच शिवसेनेमध्ये जी फूट पडली आहे त्याचा परिणाम पक्षावर होणार नाही. त्यामुळे ही फूट ग्राह्य धरू नये. तसेच ही फूट काल्पनिक असू शकते. उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. त्यामुळे जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत निर्णय घेऊ नये, असे त्यांनी सांगितले.