तांबे यांना मुख्याध्यापक मंडळाचा पाठिंबा

तांबे यांना मुख्याध्यापक मंडळाचा पाठिंबा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी होणार्‍या निवडणुकीत ( Nashik Graduate Constituency Election) सत्यजित तांबे (Satyajit Tambe )अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. मतदारसंघातून त्यांना विविध शिक्षक संघटनांकडून मिळणारा पाठिंबा दिवसागणिक वाढत आहे. राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळानेही तांबे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. तसे पत्रही त्यांनी तांबे यांना दिले आहे.

बुधवारी शिक्षक भारती आणि त्याआधी महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (एमयूएसटी) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटना यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधरचा गड काबीज करायला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.

मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या कार्यकाळात आमच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. त्यांचाच वारसा पुढे नेताना एक तरुण, होतकरू व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असणारे सत्यजित तांबे आमचे प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध राहतील, अशी आम्हाला खात्री आहे. म्हणून आमचे राज्य नेते अरुण आवारी व राज्य कार्यकारिणी त्यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे. मतदारसंघ व इतर जिल्ह्यांतील सर्व सभासदांनी तांबे यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ यांनी पाठिंबा पत्रात केले आहे.

तांबे यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा नसला तरी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केलेली कामे, सत्यजित तांबे यांचा दांडगा राजकीय अनुभव आणि काम करण्याची पद्धत यामुळे त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. परिणामी अपक्ष निवडणूक लढवूनदेखील मोठ्या प्रमाणात मतदार आणि विविध संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com