एक मे नंतर गाळप होणार्‍या उसाला घट, वाहतूक अनुदान

नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा || काजू, मोहाच्या दारूला विदेशी मद्याचा दर्जा || स्थानिक फळे, फुले इत्यादीपासून मद्यार्क उत्पादनाकरिता आसवनी परवाना देण्यास बैठकीत मान्यता
एक मे नंतर गाळप होणार्‍या उसाला घट, वाहतूक अनुदान

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 1 मेनंतर गाळप होणार्‍या उसाला घट आणि वाहतूक अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यक्षेत्राबाहेरील अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी सरकारने वाहतूक आणि साखर उतारा घट अनुदान द्यावे, अशी मागणी साखर कारखान्यांनी केली होती. या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.

बहुतांश साखर कारखाने बंद झाले असले तरी, काही कारखाने अद्यापही सुरू आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अद्यापही ऊस गाळपाविना आहे. अशा शेतकर्‍यांना या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. काजूबोंडे, मोहाफुले यापासून उत्पादित केलेल्या मद्याची वर्गवारी देशी मद्य याऐवजी आता विदेशी मद्य अशी करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या पदार्थांसह फळे, फुलांच्या मद्यार्काद्वारे स्थानिक मद्य निर्मितीच्या धोरणास मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली.

काजूबोंडे आणि मोहाफुलांच्या मद्यार्कापासून बनविण्यात येणार्‍या मद्याचे वर्गीकरण हे 2005 पासून देशी मद्य असे करण्यात आले होते. या वर्गीकरणामुळे या मद्याच्या विपणनास आणि मुल्यवृद्धीस मर्यादा येत होत्या. त्यामुळे काजूबोंडे, मोहाफुले या पदार्थांसह स्थानिकरित्या उत्पादित होणार्‍या फळे, फुले यापासून तयार होणार्‍या मद्यार्कापासून जे मद्य तयार केले जाईल त्यास देशी मद्य याऐवजी विदेशी मद्य असा दर्जा देण्यास मान्यता देण्यात येत आहे. अशा मद्यार्कापासून निर्मित होणा-या मद्यास स्थानिक मद्य असे संबोधण्यात येईल.

काजूबोंडे, मोहाफुले यासह स्थानिकरित्या उपलब्ध होणारे फळे-फुले यापासून तयार होणार्‍या मद्यार्कापासून पेय मद्य निर्मिती होईल. यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये वाया जाणार्‍या आणि नाशवंत अशा उत्पादनांचा वापर होऊन, त्यांची मुल्यवृद्धी होईल. याचा फळे, फुले उत्पादकांना लाभ होणार आहे. याशिवाय, एक स्वतंत्र उद्योग निर्माण होऊन राज्यात रोजगार निर्मिती बरोबरच महसूलात वाढ अपेक्षित असल्याचे सरकारने म्हटले आहे.

स्थानिक फळे, फुले इत्यादीपासून मद्यार्क उत्पादनाकरिता आसवनी परवाना देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. फळे, फुलांच्या उपलब्धतेनुसार कमी मद्यार्क उत्पादित झाल्यास अशा परिस्थितीत अथवा गरजेनुसार एखाद्या फळा, फुलांपासून उत्पादित मद्यार्काची दुसर्‍या फळा, फुलांपासून उत्पादित मद्यार्कामध्ये मिश्रण (ब्लेंडीग) करण्यास मुभा राहणार आहे. फळे, फुले यापासून तयार होणार्‍या मद्यार्कापासून उत्पादित होणार्‍या मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर सवलतीचा राहील.

सिलबंद विदेशी मद्याच्या विक्रीपरवान्यांसाठी नवीन दोन श्रेणी

सिलबंद विदेशी मद्याच्या विक्रीपरवान्यांसाठी नवीन दोन श्रेणी राज्यात सिलबंद विदेशी मद्याच्या किरकोळ विक्रीच्या परवान्यासाठी क्षेत्रफळ तसेच सुविधांच्या आधारे नवीन दोन श्रेणी तयार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या एफ.एल.2 परवान्यांचे क्षेत्रफळ तसेच सुविधांच्या आधारे नवीन दोन श्रेणी तयार करुन विद्यमान परवानाधारकांना त्यांच्याकडील परवान्याची श्रेणीवाढ करण्यास मुभा देण्यात येणार आहे. यात अतिउच्च दर्जाची मद्यविक्री अनुज्ञप्ती आणि उच्च दर्जाची मद्यविक्री अनुज्ञप्ती अशा दोन श्रेणीनिर्माण होऊन शासनास अतिरिक्त महसूल मिळणार आहे.

Related Stories

No stories found.