
मुंबई | Mumbai
मणिपुरमध्ये (Manipur Violance) अडकलेल्या सर्व 22 मराठी विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाम आणि मणिपुरच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यावेळी विद्यार्थ्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी लागेल ती सर्व मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले...
मणिपूर येथील हिंसाचारादरम्यान मणिपूरमध्ये शिक्षण घेत असलेले महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी तिकडे अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारची यंत्रणा अलर्ट झाली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोनवरून तेथील विद्यार्थ्यांना दिलासा देत लवकरच विशेष विमान पाठवण्यात येईल असे सांगितले.
महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत असून यातील तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधत त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना आश्वस्त केली. तसेच त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देखील दिले. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
दरम्यान, मणिपूरमधील हिंसाचारामुळे भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांनी मदतीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही एसएमएस केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फोन करून त्यांची विचारपूस केली असून त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.तसेच या विद्यार्थ्यांना परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंती करण्यात आली असून त्यांना तिथे सुरक्षित वातावरणात राहता येईल.