Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यास्ट्राँग कनेक्टिव्हीटीने नाशिकचा चेहरा मोहरा बदलणार

स्ट्राँग कनेक्टिव्हीटीने नाशिकचा चेहरा मोहरा बदलणार

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकच्या कृषी, औद्योगिक व पर्यटन विकासासाठी महत्वाचे ठरलेल्या ओझर विमानतळावरुन देशातील सात शहरात विमानसेवा सुरु झाली आहे. नाशिकमधील गतिमान वाहतूक सुविधा वाढत असल्याने पुणे, मुंबईनंतर नाशिकचा पर्याय उद्योजकांपुढे उभा राहिला आहे. यामुळे नाशिकचा विकास अधिक वेगाने होणार आहे.

- Advertisement -

नाशिक शहरातून विमान प्रवासाला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्याच्या परिस्थितीत सात वेगवेगळ्या शहरांत विमानसेवा सुरु असून दररोज शेकडो प्रवासी ये-जा करतात. मोठें अग्निदिव्य पार करून सुरु झालेल्या विमानसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी, उद्योजक आणि पर्यटनप्रेमी यांनी चांगले ब्रँडींग केले. त्यामुळेच यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक प्रवाशांची नोंद करण्यात आली. यामुळे नाशिकचा चेहरामोहरा बदलणार असून येणार्‍या काळात नाशिकचे विमानतळ मुंबईचा काही भार स्विकारण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईवरील भार कमी करण्यासाठी नाशिक विमानतळाकडे बघितले जात आहे. रोड कनेक्टीव्हीटीदेखील सुधारली असून अवघ्या दोन तासांत कल्याणचा प्रवासी थेट नाशिक विमानतळावर पोहोचू शकतो. त्यामुळे आता तर अनेक प्रवासी ठाणे, कल्याणहून नाशिकला येऊ लागले असून तिथून आपल्या हवाई प्रवासाला सुरुवात करू करतात.

अलिकडेच नाशिक विमानतळावर नाईट लँडींगलादेखील परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विमानांची वाहतूक वाढणार आहे. पर्यायाने नाशिक आता हैदराबाद, दिल्ली, मुंबई, पुणे, अहमदाबाद, बेळगाव, सुरतला थेट जोडले गेले आहे.

यापूर्वी देखील अनेक मोठ्या विमान कंपन्यांची सेवा नाशिकमधून सुरु करण्यात आली होती. नाशिकवरुन सध्या मोठ्या शहरांना जोडणारी स्पाईस जेट, एअर इंडिया, ट्रू जेट, अलायन्स एअर, स्टार एअर अशा कंपन्यांच्या विमानसेवा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे ही विमानसेवा टिकवण्यासाठी आणि आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत..

फुलांचा सुगंध सातासमुद्रापार

जिल्ह्यातील काही भागांत आजही फुलशेती केली जाते. येथील फुलांना मोठी मागणी असते. यापार्श्वभूमीवर आता विमानसेवादेखील सुरु झाल्यामुळे ही फुले काही तासांत सातासमुद्रापार जात आहेत. त्यामुळे येथील फुलशेती करणार्‍या शेतकर्‍यांना बुस्ट मिळाला असून चांगला मोबदला त्यांना यातून मिळत आहे.

विकासाला बूस्ट

ओझर येथून विमानांचे टेकअप आणि लॅडिंग व्हायला सुरुवात झाली आहे. नाशिकची द्राक्षे, इतर कृषी माल, भाजीपाला आता कार्गोमधून पोहोचू लागल्यामुळे निर्यातीला देखील पोषक वातावरण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे नाशिकमधील विकासाला खर्‍या अर्थाने बुस्ट यातून मिळणार आहे.

मुंबईचा भार उचलण्यास सक्षम

नाशिक ते मुंबई रस्त्याने जाण्यासाठी वेळ तीन तासांवर आला आहे. पुढील काही दिवसांत हे अंतर आणखी कमी होईल. या पार्श्वभूमीवर कल्याण, ठाणे परिसरातील प्रवासी थेट नाशिकला येऊन विमानप्रवासाला प्रारंभ करू शकतात. आजच अनेक प्रवासी कल्याणहून नाशिकमध्ये येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

ब्रँडींग व्हावे

नाशिकमधून विमानसेवा मोठमोठया शहरांना जोडली गेली आहे. मात्र, याबाबतची माहिती उत्तर महाराष्ट्र, कसमादे पट्टा परिसरात पाहिजे इतकी झाली नाही. त्यामुळे या परिसरातील विमानप्रवास करु इच्छिणार्‍या प्रवाशांपर्यंत पोहोचले पाहिजे. येथील अनेक प्रवासी मुंबईचा पर्याय निवडतात. त्यामुळे दुर्लक्षित भागात विमानसेवेचे ब्रँडींग होणे गरजेचे आहे.

मंगेश पाटणकर, माजी अध्यक्ष, निमा

- Advertisment -

ताज्या बातम्या