एसटी सेवकांचा संप सुरूच; प्रवाशांचे हाल

542 सेवकांचे निलंबन
एसटी सेवकांचा संप सुरूच; प्रवाशांचे हाल

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

एसटी महामंडळाचे MSRTC राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेला एसटी कामगारांचा संप सुरूच आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही संप मागे घेण्यास कामगार तयार नसल्याने एसटी महामंडळ आक्रमक होत कालही 542 कामगारांवर निलंबनाची कारवाई Suspension action on 542 workers केली. तसेच संपकर्त्याविरूद्ध न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.दरम्यान,संपामुळे राज्यभारतील 250 आगार बंद असल्याने प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.

न्यायालयाचा आदेश झुगारून संप करणारी कामगार संघटना व संपकरी कामगारांच्या विरोधात एसटी महामंडळाने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. सुनावणी अंती उच्च न्यायालयानं प्रतिवादींना शुक्रवारपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी कामगारांनी दिवाळीच्या आधीपासून संप पुकारला आहे. न्यायालयाने बंदी

आदेश जारी करून व नंतर राज्य सरकारने मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करूनही संपकरी कामगार मागे हटायला तयार नाहीत. त्यामुळे एसटी महामंडळाने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटना, या संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर आणि तब्बल 340 जणांविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे.

या सर्वांनी औद्योगिक न्यायालयाचा 29 ऑक्टोबरचा आदेश आणि मुंबई हायकोर्टाचे 3 नोव्हेंबर व 8 नोव्हेंबरचे आदेश यांचा भंग करून संप केला आहे. त्यांच्या विरोधात न्यायालय अवमान कायद्याखालील तरतुदीअन्वये कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती महामंडळानं अ‍ॅड. जी. एस. हेगडे यांच्या मार्फत केली आहे.

न्यायालय अवमानविषयी कारवाई नको असल्यास तात्काळ कामावर रुजू होण्याचे निर्देश या संपकरी कर्मचार्‍यांना द्यावेत आणि कामावर जाणार्‍या इतर कर्मचार्‍यांना रोखू नये, असेही निर्देश द्यावेत. तसेच, एसटी बस आगारांपासून पाचशे मीटर अंतरापर्यंत कोणतेही धरणे आंदोलन किंवा अन्य आंदोलन करण्यापासून त्यांना रोखावे आणि एसटी आगारांना पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश द्यावेत, अशीही विनंती याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने प्रतिवादींना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन मागे घ्या : मुख्यमंत्री

राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्व कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करा, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी एसटी कर्मचार्‍यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. एसटी कर्मचार्‍यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी राज्य सरकार मनापासून प्रयत्न करीत आहे.

उच्च न्यायालयासमोर देखील सरकारने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचेही समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. गरीब एसटी कर्मचार्‍यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसाराच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका, अशी विनंतीही ठाकरे यांनी राजकीय पक्षांना केली आहे. शिवाय ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या, असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com