Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याप्रतिबंधित भागात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा

प्रतिबंधित भागात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा

नाशिक । प्रतिनिधी

राज्यात करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आता जिल्हा स्तर, महापालिका क्षेत्र अशा ठिकाणी करोना रुग्ण आढळलेल्या प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेल्या भागात आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक यांना दिले.

- Advertisement -

राज्यात करोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध, कर्फ्यु, नाकाबंदी, प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करुन त्याचा फारसा फायदा होतांना दिसत नाही. दररोज मोठ्या प्रमाणात करोना बाधीत समोर येत असून आता आरोग्य यंत्रणेकडून सेवा पुरवण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. या एकुणच पार्श्वभूमीवर आता करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक अंमंलबजावणी करण्यासंदर्भात आज राज्याचे प्रधान सचिव कुंटे यांनी आज राज्यातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मिटींग घेतली.

यात महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पांडेय सहभागी झाले होते. यावेळी नाशिक महापालिका व शहरातील वाढत्या रुग्णांची माहिती घेतल्यानंतर कुंटे यांनी करोना प्रतिबंधीत क्षेत्रात दिलेल्या नियमांचे कठोर पालन करण्याचे निर्देश दिले. तसेच शहरातील बाजारपेठा, भाजीपाला मार्केट याठिकाणी होणार्‍या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्यात यावी, तसेच अनावश्यक नागरिक रस्त्यावर येणार नाही यासंदर्भात काळजी घेऊन कारवाई करावी अशा स्वरुपाच्या सुचना देत याची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रधान सचिवांनी अधिकार्‍यांना दिले.

या व्हिडीओ कॉन्फरसिंगनंतर काही वेळेतच महापालिका आयुक्त जाधव व पोलीस आयुंक्त पांडेय यांनी शहरातील काही भागांना भेटी दिल्या. याठिकाणी पोलीस बंदोबस्तावर असलेल्या अधिकार्‍यांना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. बाजारपेठेत गर्दी होऊ नये याकरिता नाकाबंदी कडक करण्यात यावी, याकडे अधिकार्‍यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. या शासनाच्या निर्णयानंतर आता शहरात निर्बंधाच्या कठोर अंमलबजावणीच्या हालचाली शहर पोलीस व महापालिकेकडुन सुरु झाल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या