
नवी दिल्ली | New Delhi
ओडिशामधील (Odisha) बालासोर (Balasore) येथील बहनागा बाजार स्टेशनजवळ तीन रेल्वेत झालेल्या विचित्र अपघातात (Train Accident) २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर ओडिशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या रेल्वे अपघातानंतर देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत बचावकार्याचा आढावा घेतला...
यावेळी पंतप्रधान मोदींनी रुग्णालयात जाऊन जखमींची (injured) विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "ही दुर्दैवी घटना असून मनाला विचलित करणारा अपघात आहे. जखमींच्या उपचारासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू (Death) झाला, त्यांना परत आणू शकत नाही. पण, सरकार कुटुंबीयांच्या दुखा:त सहभागी आहे." असे मोदींनी म्हटले.
मोदी पुढे म्हणाले की, सरकारसाठी ही घटना अत्यंत गंभीर असून प्रत्येक कोनातून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असून त्यांना सोडणार नाही. या घटनेनंतर ओडिशा सरकार आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या संसाधनांच्या माध्यमातून लोकांची मदत केली. तसेच येथील नागरिकांनाही देखील संकटकाळात रक्तदान आणि बचावकार्याचे काम केल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.