मनपाकडून कर वसुलीसाठी धडक मोहीम

मनपाकडून कर वसुलीसाठी धडक मोहीम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व कर उपायुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करवसुली ( Tax Arrears)मोहीम तीव्र करण्यात आली असून, एकट्या नाशिकरोड विभागातील 49 थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावण्यात आल्यानंतर गेल्या पंधरा दिवसात 1.67 कोटींची थकबाकी वसूल करण्यात यश आले आहे.

महापालिकेच्या सहाही विभागात कर वसुली मोहीम राबवली जात आहे. नाशिकरोड विभागीय कार्यालयाने गेल्या पंधरा दिवसात घरपट्टीच्या थकबाकीपोटी 89 लाख 1 हजार 634 रुपये तर पाणीपट्टीचे 77 लाख 69 हजार 434 रुपये वसूल केले आहेत.

नाशिकरोड विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या थकबाकीदारांविरोधात धडक मोहिम राबविण्यात येत आहे. या विभागात 7,468 थकबाकीदारांना अंतिम सूचनापत्र बजावण्यात आले आहेत. त्यापैकी 49 थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावण्यात आले आहेत. घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत असलेल्या नागरिकांनी आणि आस्थापनांनी चालू वर्षाचा आणि मागील वर्षांचा थकीत कर त्वरीत भरावा, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेतर्फे देण्यात आला आहे.

नाशिकरोड विभागीय कार्यालयातर्फे राबविण्यात आलेल्या मोहिमेत कर विभागाचे सहाय्यक अधिक्षक शरदकुमार जाधव, हेमंत रौंदाळे, राकेश पवार, महेंद्र कुम्हे, वसुली कर्मचारी कैलास आहिरे, संजय बेंद्रे, कैलास वाघ, रमेश मुल्हेरकर आदींनी सहभाग घेतला.

नोटप्रेसकडून 46 लाख वसुल

नाशिकरोड विभागातील आयएसपी व सीएनपी नोटप्रेस या शासकीय आस्थापनांकडे महापालिकेची वर्षानुवर्षांपासूनची पाणीपट्टी थकीत आहे. त्यापैकी 46 लाख 43 हजार 138 रुपये वसूल करण्यात पालिकेच्या पथकाला यश आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com