Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यासंरक्षण क्षेत्राला बळ; जीई-एचएएल लढाऊ जेट इंजिन निर्मिती करणार

संरक्षण क्षेत्राला बळ; जीई-एचएएल लढाऊ जेट इंजिन निर्मिती करणार

वॉशिग्टन । वृत्तसंस्था

भारतीय युद्धविमानांना आता अमेरिकेचे इंजिन बसवण्यात येणार असून अमेरिकेतील जीई एरोस्पेस आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात याबाबत महत्त्वपूर्ण करार झाला आहे. या अंतर्गत जीई एरोस्पेस, एचएएलच्या सहकार्याने भारतीय हवाई दलासाठी लढाऊ जेट इंजिन बनवणार आहे. पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौर्‍यावर असताना हा करार झाला आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण क्षेत्राला बळ मिळणार आहे.

- Advertisement -

जीई एरोस्पेसने सांगितले की, या करारांतर्गत भारतात जीई एरोस्पेसच्या जी4 14 इंजिनचे उत्पादन होईल. सध्या जीई एरोस्पेस यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अमेरिकन सरकारसोबत काम करत आहे. हा करार भारतीय हवाई दलाच्या लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट एमके 2 साठी करण्यात आला आहे. जीई चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एच. लॉरेंस कल्प जूनियर म्हणाले की, हा भारत आणि एचएएलसोबतचा आमचा ऐतिहासिक करार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांमधील जवळचा समन्वय वाढवण्यात जी भूमिका बजावली आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे. आमची जी414 इंजिने अतिशय मजबूत आहेत आणि दोन्ही देशांसाठी महत्त्वपूर्ण ठरतील.

जीई एरोस्पेस भारतात 4 दशकांहून अधिक काळापासून कार्यरत आहे. पण, आतापर्यंत जीई एरोस्पेस भारतात एव्हियोनिक्स, इंजीनिअरिंग, उत्पादन आणि स्थानिक सोर्सिंग क्षेत्रात काम करत होता. पण, आता जी414 इंजिन बनवण्याचे काम केले जाणार आहे.

भारत-अमेरिका संयुक्त अंतराळ मोहिम

भारत आणि अमेरिकेने 2024 मध्ये संयुक्त अंतराळ मोहिमेची घोषणा केली आहे. भारताने आर्टेमिस करारात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि भारताची अंतराळ संस्था इस्रो 2024 मध्ये संयुक्त आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहीम सुरु करणार असल्याचे देखील व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले.

सेमीकंडक्टर मिशनला पाठिंबा

भारतीय राष्ट्रीय सेमीकंडक्टर मिशनला पाठिंबा देण्यासांठी अमेरिका यूएसडी 800 दशलक्ष पेक्षा जास्त गुंतवणूक करेल आणि यूएस फर्म अप्लाइड मटेरियल्स नाविन्यपूर्णतेसाठी नवीन सेमीकंडक्टर केंद्र स्थापन करेल.खनिज सुरक्षा भागीदारीचा सदस्य होण्यासाठी भारताला अमेरिका पाठिंबा जाहीर करेल. यामुळे खनिज पुरवठा साखळी मजबूत होईल.

अहमदाबाद, बेंगळुरूत दूतावास

अमेरिका बेंगळुरू आणि अहमदाबादमध्ये दोन नवीन वाणिज्य दूतावास सुरू करणार आहे तर भारत सिएटलमध्ये दुतावास स्थापन करेल आणि भारतात परत न जाता एच1बी व्हिसाच्या नूतनीकरणाचा निर्णय घेण्यासाठी ते पायलट सुरू करणार आहेत.

विविध राजकीय कार्यक्रमांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांची भेट घेतली. यावेळी अमेरिकेच्या अध्यक्षांनी मोदींना आणि मोदींनी अध्यक्षांसह फर्स्ट लेडी यांना काही भेटवस्तू दिल्या. मोदी यांनी जिल बायडेन यांना 7.5 कॅरेटचा ग्रीन डायमंड दिला.

तर अध्यक्ष जो बायडेन यांना चंदनाच्या लाकडापासून बनलेली पेटी भेट म्हणून दिली आहे. या पेटीत त्यांच्यासाठी अनेक भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या वतीने अध्यक्ष जो बायडेन यांना दिलेल्या भेटवस्तूंमधून भारतीय संस्कृतीची एक झलक पाहायला मिळते. त्यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये विविधतेने नटलेल्या भारतातील विविध राज्यांची ओळख असलेल्या वस्तूंचा समावेश आहे. म्हैसूरमधल्या चंदनापासून बनलेली लाकडी पेटी यामध्ये गणपती बाप्पांची सुबक अशी चांदीची मूर्ती, एक पणती देखील आहे.

या चंदनाच्या पेटीत चांदीच्या 10 छोट्या डब्या आहेत. यामध्ये पंजाबचे तूप, राजस्थानमधीलं 24 कॅरेट हॉलमार्क केलेले सोन्याचे नाणे, 99.4 कॅरेट चांदीचे नाणे, महाराष्ट्राचा गूळ, उत्तराखंडचा तांदूळ, तामिळनाडूतील तीळ, भूदानाचे प्रतीक म्हणून (भूमीचे दान) कर्नाटकातल्या चंदनाचा तुकडा, गोदानाचे (गायीचे दान) प्रतीक म्हणून पश्चिम बंगालमधल्या कारागिरांनी घडवलेला चांदीचा नारळ, झारखंडमधील हाताने विणलेले रेशमी कापड, गुजरातमधील मीठ देण्यात आले आहे.

मी सर्वात आधी राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी केलेल्या स्वागतासाठी मनापासून धन्यवाद देतो. व्हाईट हाऊसमध्ये जबरदस्त स्वागत केले हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. त्या सन्मानासाठी मी राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि जिल बायडन यांचे आभार मानतो. 3 दशकापूर्वी सर्वसामान्य नागरिक म्हणून यूएसला आलो होतो, तेव्हा व्हाईट हाऊस केवळ बाहेरून पाहता आले. यावेळी पहिल्यांदाच व्हाईट हाऊसचे दरवाजे इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय अमेरिकनसाठी उघडण्यात आले.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध 21 व्या शतकातील सर्वात निर्णायक संबंधांपैकी एक आहे.भारत आणि अमेरिका दारिद्र्य दूर करणे, आरोग्यसेवेचा विस्तार करणे, हवामानातील बदलांना संबोधित करणे आणि युक्रेनमधील रशियन युद्धामुळे निर्माण झालेल्या अन्न आणि ऊर्जा असुरक्षिततेचा सामना करण्यासाठी जवळून काम करत आहे.

– जो बायडेन, अध्यक्ष, अमेरिका

- Advertisment -

ताज्या बातम्या