नाशिक । प्रतिनिधी

करोनाची दुसरी लाट आली असून, मृत्यूदरही वाढला आहे. शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक, पालक तसेच विद्यार्थ्यांचा करोनाने बळी गेला आहे. त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर इयत्ता बारावीसाठी निवडक विषयाची परीक्षा घ्यावी, असा पर्याय महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने सुचविला आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात जमावबंदी आदेश लागू केल्याने नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाही. या परिस्थितीत तोंडावर आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थी व पालक प्रचंड तणावात आहे. सरसकट सर्वच विषयाची परीक्षा न घेता इंग्रजीसह विविध शाखेतील ठराविक विषयांची परीक्षा घ्यावी. अर्थात कमी कालावधीत केवळ महत्त्वाच्या विषयांची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागणार असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे.

विज्ञान शाखेसाठी केवळ भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित तर वाणिज्य शाखेसाठी अकाउंट व अर्थशास्त्र विषयांचे पेपर घ्यावी. कला शाखेसाठी अर्थशास्त्र व मानसशास्त्र आदी निवडक विषयांची तज्ञांच्या मार्फत निवड करून परीक्षा घेणे शक्य आहे. सर्व शाखेच्या इतर विषयांचे मुल्यांकन महाविद्यालयीन स्तरावरून ग्रेड पध्दतीने देता येईल. असेही महासंघाने सुचविले.

हे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनावर महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे, सचिव प्रा. संतोष फाजगे, समन्वयक प्रा. मुकुंद आंदळकर यांची नावे व स्वाक्षरी आहेे.

परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

राज्यात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. दोन पेपरमध्ये पुरेसे दिवस अंतर ठेऊन परीक्षेचे नियोजन केले तरी धोका कायम आहे. त्यामुळे परीक्षा एक महिना पुढे ढकलण्याची मागणी महासंघाने केली