‘लम्पी’च्या निदानासाठी राज्यस्तरीय कार्यदल

मंत्रालयात समन्वय कक्ष
‘लम्पी’च्या निदानासाठी राज्यस्तरीय कार्यदल

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यात वेगाने पसरत असलेल्या जनावरांच्या लम्पी (Lumpy) चर्मरोगाच्या संदर्भात राज्यस्तरीय कार्यदलाची निर्मिती करण्यात आली आहे. राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय कार्यदल स्थापन करण्यात आले असून लम्पी रोग आटोक्यात आणण्यासाठी नियमित आढावा घेऊन त्यावर उपाययोजना आणि शिफारस हे कार्यदल करणार आहे.

राज्यात लंपी चर्मरोगावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण करणे, बाधीत पशुधनास औषधोपचार करणे, पशुपालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्यवाही युध्दपातळीवर सुरु आहे. तथापि, काही ठिकाणी पशुपालकांना येणार्‍या समस्या, अडचणीचे निराकरण करुन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, तसेच शेतकरी पशुपालकांना संपर्क साधता यावा आणि क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधता यावा यासाठी मंत्रालयामध्ये समन्वय कक्ष सुरु करण्यात आला आहे, असे पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता यांनी सांगितले.

पशुसंवर्धन आयुक्तांसह राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद व इतर सर्व संबंधित अधिकारी) यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.

सदर बैठकीमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव, यावर करण्यात आलेल्या व येणार्‍या उपाय योजना, तसेच इतर सर्व अनुषंगिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करून, पशुधनावर आलेल्या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाय योजना तातडीने कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले.

मंत्रालयात समन्वय कक्ष

राज्यातील शेतकरी पशुपालकांना लंपी रोगाविषयी संपर्क साधण्यासाठी मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचा संपर्क क्रमांक 022-22845132 असा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com